नवी दिल्ली: लग्न सोहळा संपन्न झाल्यावर नवरा-नवरी सजवलेल्या गाडीतून घरी जातात. तुम्ही अनेकदा अशा सजवलेल्या गाडी पाहिल्यादेखील असतील. मात्र कर्नाटकमध्ये एक नवऱ्यानं नव्या नवरीला घरी नेण्यासाठी चक्क जेसीबी आणला. कर्नाटकमधील पुत्तूलमध्ये झालेल्या या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण नवरीला नेण्यासाठी जेसीबी आणण्यात येईल, याची लग्नाला आलेल्या कोणालाही कल्पना केली नव्हती. नव्या नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी चक्क जेसीबी आणणाऱ्या नवऱ्याचं नाव चेतन असं आहे. चेतन जेसीबी चालवतो. त्यामुळे जेसीबीमधून बायकोला घरी नेण्याचा विचार त्याच्या मनात आला. पुत्तूलच्या परपुंजा तालुक्यात चेतनचं ममतासोबत लग्न झालं. लग्न करुन दोघे कुटुंबासह हॉलबाहेर आले, त्यावेळी समोर जेसीबी उभा होता. यानंतर चेतन आणि ममता जेसीबीमध्ये बसले. विशेष म्हणजे हे नवदाम्पत्य जेसीबीच्या बकेटमध्ये बसलं होतं. लग्नात काहीतरी हटके करायचं, असं चेतननं आधीच ठरवलं होतं. त्यामुळे याची तयारी त्यानं आधीपासूनच केली होती. चेतन आणि ममताचं लग्न सुरू असताना हॉलबाहेर फुगे लावलेला जेसीबी तयार होता. यामध्ये चेतनच्या मित्रांनी त्याची मदत केली. लग्न सोहळा संपल्यावर चेतन आणि ममता जेसीबीच्या बकेटमध्ये बसले आणि घराच्या दिशेनं निघाले. अनेकदा नवदाम्पत्य लक्झरी गाडीतून घरी येतं. मात्र चेतन आणि ममता चक्क जेसीबीनं घरी पोहोचले. ही अनोखी वरात पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी झाली होती.
आलिया गावात अजब वरात, पोरीला न्यायला JCB दारात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 12:19 PM