नवी दिल्ली – १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीवेळी अनेक कुटुंब विखुरली गेली. त्यातीलच एक मोहम्मद सिद्दिकी. सिद्दिकी यांचे भाऊ हबीब उर्फ शेला फाळणीनंतर भारतातच राहिले. आता ७४ वर्षानंतर करतारपूर कॉरिडोर, जे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारत यांना जोडतं, त्याने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे.
सध्या सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून अनेक जण खूप भावूक झालेत. या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिद्दिकी पाकिस्तानीच्या फैसलाबाद येथे राहतात तर त्यांचा भाऊ भारताच्या पंजाब प्रांतात राहतात. करतारपूरमध्ये दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर भावूक झाले. एकमेकांची गळाभेट केली तेव्हा अश्रूंचा बांध फुटला. इतक्या वर्षांनी दोघांची भेट झाली होती.
सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दोन्ही भाऊ करतारपूर कॉरिडोरमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही लोकं आहेत. व्हिडिओत दोघंही एकमेकांना भावूक होऊन मिठी मारताना दिसून येतात. या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान सरकारला करतारपूर कॉरिडोर उघडल्याबद्दल आभार मानले आहेत. कॉरिडोरच्या माध्यमातून भारताचे लोक विना व्हिसा पाकिस्तानच्या करतारपूर येथे जाऊ शकतात. हा कॉरिडोर २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सुरु झाला होता.
ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. मागील वर्षीही एकमेकांपासून दुरावलेल्या दोन मित्रांची भेट ७३ वर्षांनी झाली होती. भारतात राहणाऱ्या सरदार गोपाल सिंह यांचा लहानपणीचा मित्र पाकिस्तानातील मोहम्मद बशीर हे दोघंही फाळणीनंतर एकमेकांपासून दूर गेले. या दोघांचीही भेट करतारपूर कॉरिडोरमुळे झाली होती. भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. यालाच करतारपूर साहिब कॉरिडोर म्हणतात. करतारपूर साहिब हे शीख धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यात ते आहे. तर करतारपूरला पहिला गुरुद्वारा मानलं जातं. ज्याचा पाया गुरु नानक देव जी यांनी रचला होता. याठिकाणी माथा टेकवण्यासाठी भारतातून अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी पाकिस्तानात जात असतात.