कोट्टयम – तुम्ही रस्त्याने जाताना अनेकदा मोठमोठे होर्डिग्स बघितले असतील, एखाद्या प्रोडेक्टची जाहिरात किंवा राजकीय पक्षांचे बॅनर्स रस्त्याला लागलेले दिसतात. ग्रामीण भागात तर लग्नाचे बॅनर्सही झळकतात. पण सध्या केरळच्या कोट्टयम जिल्ह्यातील एक बॅनर चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून लग्नाची इच्छा असणाऱ्या युवकाने वधू पाहिजे असा बॅनर झळकावला आहे.
अनीश सेबास्टियनने एट्टुमानुरच्या कनक्करी जवळ एक मोठा पोस्टर लावला आहे. ३५ वर्षीय या युवकाने त्या पोस्टरचा फोटोही त्याच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. या युवकाची कोणतीही मागणी नाही असं त्यानं लिहिलं आहे. फ्लेक्स बोर्डमध्ये तरुणाने त्याचा मोठा फोटा लावला आहे. त्यात त्याचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबरही लिहिलेला आहे. यात एक ईमेल आयडी देखील लिहिला आहे आणि यात मुलीने किंवा तिच्या कुटुंबियांनी लग्नासाठी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.
पारंपारिक पद्धतीने मुलगी मिळाली नाही म्हणून ही शक्कल लढवली
लग्न होत नसल्याने वय निघून जात असल्याचं अनीश सेबस्टियनने सांगितले. त्याला पारंपारिक पद्धतीने मुलगी पाहून कंटाळा आला, मनासारखी मुलगी पसंत पडत नसल्याचं तो म्हणाला. यानंतर, त्याला अशी कल्पना आली की सर्व लोकांना माहिती हवं मी लग्न करण्यासाठी मुलीच्या शोधात आहे. म्हणून अशाप्रकारे होर्डिंग लावलं आहे. अँरेज मेरेजममुळे अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. इंटरनेटवरून अनेक लग्न जुळतात पण ते अयशस्वी ठरतात. म्हणून स्वत: साठी अशा प्रकारे परफेक्ट जोडीदार शोधण्याचा प्रयत्न असल्याचं अनीशने सांगितले.
'कोरोना काळातील चांगली कल्पना'
या तरुणाने सांगितले की, कोरोनाच्या काळात लोकांच्या घरी जाणे शक्य नाही. लोक एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लग्न जुळवण्यासाठी हे माध्यम सर्वोत्कृष्ट आहे. होर्डिंग लावल्यापासून बरेच लोक संपर्क साधत आहेत असं त्याने सांगितले. मात्र शहरभरात लावलेल्या या बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.