नशीब फळफळले! मोहम्मद बावा तासाभरात बनले करोडपती, जिंकली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 09:22 PM2022-07-29T21:22:29+5:302022-07-29T21:23:16+5:30
Kerala man wins ₹1 crore lottery : घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने मोहम्मद बावा यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले.
कर्जबाजारी मोहम्मद बावा यांनी घर विकण्याची तयारी केली होती. घर विकण्यासाठी ग्राहकाकडून फक्त टोकन मिळणे बाकी होते. पण नशीब किंवा चमत्कारच म्हणा की त्यांना अचानक एक कोटींचा जॅकपॉट (Jackpot) लागला आणि एका मिनिटात तो करोडपती झाला. ही कहाणी नाही तर वास्तव आहे. केरळमधील मोहम्मद बावा हे कर्जात बुडाले होते आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नुकतेच बांधलेले घर विकण्याचा निर्णय घेतला. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने त्यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले.
केरळमधील कासारगोड ( Kasaragod)जिल्ह्यातील मंजेश्वर गावातील मोहम्मद बावा यांना सुमारे 50 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी नातेवाईक आणि बँकेकडून पैशांची गरज होती. दोन मुलींचे लग्न आणि व्यवसायातील तोटा यामुळे तो कर्जात बुडाले होते. त्यांनी कर्ज म्हणून मोठी रक्कम घेतली होती. कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्यांनी आपले नवीन घर विकण्याचा निर्णय घेतला होता.
मोहम्मद बावा यांनी सांगितले की, मी काळजीत होतो आणि देवाचे स्मरण करत होतो. कदाचित त्याने माझे ऐकले असेल. केरळ सरकारच्या फिफ्टी-फिफ्टी लॉटरीचा निकाल रविवारी दुपारी 3.30 वाजता मला कळला. मी सुदैवाने एक कोटी रुपये जिंकले होते. आदल्या दिवशीच, माझ्या घराच्या खरेदीदाराने आम्हाला सांगितले की, तो टोकन आगाऊ देण्यासाठी संध्याकाळी 5.30 वाजता आमच्या घरी येणार आहे. पण जेव्हा तो माझ्या घरी पोहोचला तेव्हा माझ्या घरात गर्दी होती आणि लॉटरी जिंकल्याबद्दल माझे अभिनंदन करण्यासाठी लोक आले होते. पण माझ्या भाग्यवान विजयाने घर खरेदीदार सुद्धा खूप खुश झाला होता.
"मी लॉटरी जिंकली आहे, त्यामुळे आता माझे घर विकण्याची गरज नाही, या पैशाने आमचे सर्व प्रश्न सुटतील," असे मोहम्मद बावा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, "मी नियमितपणे लॉटरीची तिकिटे काढत नाही. मी त्या लॉटरी एजंटला वैयक्तिकरित्या ओळखतो, म्हणून जेव्हा तो माझ्या घराजवळून जात असे तेव्हा तो मला काही तिकिटे देत असे", असही मोहम्मद बावा यांनी सांगितले.
याचबरोबर, "मला लॉटरी लागेल, या अर्थाने मी हे तिकीट खरेदी केले नाही. पण नशीब असे की एक कोटी रुपये जिंकले. माझे संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर मी उरलेली रक्कम गरीब आणि गरजूंमध्ये वाटून देईन", असेही मोहम्मद बावा म्हणाले. दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार, एक कोटी रुपयांमधून टॅक्स कपात केल्यावर मोहम्मद बावा यांना 63 लाख रुपये मिळतील.