केरळचा ऑटो ड्रायव्हर झाला १२ कोटी रुपयांचा धनी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:11 AM2021-10-16T08:11:05+5:302021-10-16T08:12:05+5:30
केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते.
नवी दिल्ली : केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते.
जयपालन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी काम करीत होता. त्यामुळे त्याला वेळच नव्हता. संध्याकाळी टीव्हीवर घोषित झालेला विजेता क्रमांक आपल्या तिकिटाचा आहे, हे त्याने पाहिले. अन् त्याची झोपच उडाली. त्याने संपूर्ण रात्र जागून काढली. पण, त्याचवेळी त्याने आपली शांतता ढळू दिली नाही. भावनांना आवर घातला. त्याने ही बातमी फक्त आपल्या आईला सांगितली. त्याने
सकाळपर्यंत वाट पाहिली. सकाळी वृत्तपत्रात पुन्हा निकाल पाहून खात्री करून घेतली.
जयपालनने सांगितले की, निकाल माहीत झाल्यानंतर माझा मेंदू पूर्णत: बधीर झाला. जणू विचारच थांबले. मी निकाल अनेकवेळा तपासला. आईला लॉटरी जिंकल्याचे सांगितले होते, पण रक्कम सांगितली नव्हती.
जयपालनच्या पत्नीचे नाव मनी असून त्यांना दोन मुले आहेत. लॉटरी लागली तेव्हा पत्नी मनी आणि मोठा मुलगा वैशाख दोघेही ड्यूटीवर होते. धाकटा मुलगा विष्णू शिक्षणानिमित्त कोझिकोडेला होता. फक्त आई लक्ष्मी घरी होती. म्हणून तिला त्याने माहिती दिली.
- पत्नी आणि मुलांना तर, आधी लॉटरी लागली या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. आपल्या एका नातेवाईकाला घेऊन तो बँकेत गेला तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनाही प्रथमत: त्याच्यावर विश्वास बसत नव्हता.
- जयपालनने सांगितले की, या पैशातून मी माझ्या घराजवळच्या विष्णू मंदिराला देणगी देणार आहे. माझे कर्ज फेडणार आणि काही रक्कम माझ्या जवळच्या नातेवाईकांना देणार.