केरळमध्ये उधार घेतलेल्या पैशामधून 11 महिला रातोरात करोडपती झाल्याची घटना घडली आहे. या महिलांकडे काही आठवड्यांपूर्वी लॉटरीचं तिकिट घेण्यासाठी 250 रुपयेही नव्हते आणि आता त्यांना 10 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा महिलांनी 250 रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पर्समध्ये 25 रुपयेही नव्हते.
एकीने आपले नशीब आजमावण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून थोडी रक्कम उधारही घेतली. 11 महिला केरळच्या परप्पनंगडी नगरपालिकेच्या अंतर्गत हरित सेनेमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करतात. या महिलांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्या क्षणात करोडपती होतील. बुधवारी झालेल्या ड्रॉनंतर केरळ लॉटरी विभागाने त्याला 10 कोटी रुपयांच्या मान्सून बंपरचा विजेता घोषित केलं.
सहकाऱ्यांकडून पैसे गोळा करून तिकीट घेतलेली राधा उत्साहाने म्हणाली, 'आम्ही याआधीही पैसे जमवून लॉटरीचं तिकिट घेतलं आहेत. पण कोणताही मोठा पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसर्या महिलेने सांगितले की ती ड्रॉची आतुरतेने वाट पाहत होती, परंतु जेव्हा कोणीतरी तिला सांगितलं की, शेजारच्या पलक्कड येथे विकल्या गेलेल्या तिकिटाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे तेव्हा तिचे मन दुखावलं गेलं.
ती म्हणाली, 'जेव्हा शेवटी कळलं की आम्हाला जॅकपॉट मिळाला आहे, तेव्हा उत्साह आणि आनंदाला थारा नव्हता. आपण सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत आणि पैशामुळे आपल्या समस्यांचं निराकरण करण्यात मोठ्या प्रमाणात फायदा होईल. महिलांना उदरनिर्वाह करणं कठीण जातं आणि त्यांना हरितकर्म सेनेचे सदस्य म्हणून मिळणारे तुटपुंजे वेतन हे त्यांच्या कुटुंबासाठी एकमेव उत्पन्न आहे.
हरिता कर्म सेना घरे आणि आस्थापनांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा उचलते, जो श्रेडिंग युनिट्समध्ये पुनर्वापरासाठी पाठवला जातो. नगरपालिकेतील हरित कर्म सेना संघाच्या अध्यक्षा शीजा म्हणाल्या की, यावेळी नशिबाने सर्वाधिक पात्र महिलांना साथ दिली आहे. त्या म्हणाल्या की, सर्व विजेत्या खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचं एकमेव साधन आहेत.
अनेकांना कर्ज फेडावे लागते... मुलींची लग्ने करावी लागतात किंवा त्यांना त्यांच्या प्रियजनांच्या उपचाराचा खर्च उचलावा लागतो. अत्यंत साध्या घरात त्या जीवनातील कठोर वास्तवाशी लढत राहतात असंही त्या म्हणाल्या. बंपर लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी येथील महापालिकेच्या गोदाम संकुलात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.