आपल्याला नेहमी असं वाटतं की, पोलिसांच्या वर्दीत असलेल्या माणसाला कायम हत्या, चोरी, मारहाणसारख्या घटना पाहण्याची सवय झाली असावी. परंतु त्यांच्यातही माणसाचं मन असतं. असाच एक मोठं मन असलेला अमेरिकेतील पोलीस अधिकारी निकोलस क्विटाना(Nicholas Quintana) मर्डर सीनचा तपास करण्यासाठी पोहचला होता. याठिकाणी जेव्हा त्याने ५ अनाथ मुलांना रडताना पाहिलं आणि त्याचं मन व्यथित झालं. त्याने पत्नीसोबत चर्चा करत या सर्व मुलींना घरी आणलं.
ही घटना १४ जानेवारी २०२२ ची आहे. जेव्हा निकोलसला लंच ब्रेकच्या दरम्यान, एका हत्येबाबत फोन आला. त्यानंतर इतर पोलीस सहकाऱ्यांसोबत ते घटनास्थळी पोहचले. याठिकाणी एका महिलेने तिच्या पतीची हत्या केली होती. यावेळी घरात ५ लहान मुलं होती. हे दृश्य पाहून मुलांना धक्का बसला होता. आरोपी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर निकोलस संध्याकाळी घरी परतले. परंतु त्यांच्या डोक्यातून त्या ५ निष्पाप मुलांचा विचार काहीही केल्या जात नव्हता.
अनाथ झालेल्या मुलांना घेतलं दत्तक
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय एमिली एज्रानं तिचा पती पॉलची दुपारी गोळ्या झाडून हत्या केली. मिररच्या रिपोर्टनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरात ५ मुलं हजर होती. एमिलीवर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या निकोलसला या घटनेने लहानपणीची आठवण आली. जेव्हा त्याच्या वडिलांची कुटुंबातीलच इतर सदस्याने गोळी मारुन हत्या केली होती. निकोलसला ते दिवस आठवले. त्यानंतर या ५ निष्पाप मुलांच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. निकोलसनं घरी येऊन पत्नी अमांडासोबत याविषयी चर्चा केली. त्यानंतर तिला घेऊन त्या मुलांना भेटायला गेला. मुलांना भेटल्यानंतर पती-पत्नीनं त्या मुलांना दत्तक घेण्याचा एकत्रित निर्णय घेतला.
मुलांनाही विश्वास बसला नाही
निकोलसनं जेव्हा मुलांना सांगितले की, मी तुम्हाला दत्तक घेतो. त्यावर सर्वात मोठ्या मुलाने आश्चर्याने विचारलं खरंच तुम्ही असं करताय? तेव्हा निकोलसनं त्यांना समजावलं. आता वडिलांप्रमाणे निकोलस या मुलांना प्रेम देणार आहे. या मुलांना निकोलसनं घरी आणल्यानंतर त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. निकोलस आता या मुलांच्या दत्तक पत्र बनवण्याच्या तयारीत आहे.