ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 31 - प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढत पश्चिम बंगाल सरकारने बायोगॅसवर धावणा-या बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे. काही दिवसांमध्ये कोलकाताच्या रस्त्यावर बायोगॅसवर धावणा-या बसेस पाहायला मिळतील. मार्च अखेरपर्यत या बस सेवेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. केंद्रीय अनुदान योजनेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. देशामध्ये अशा प्रकारची ही पहिलीच बस असेल. विशेष म्हणजे या बसमध्ये 17 किमीसाठी किमान भाडं फक्त एक रुपया असणार आहे.
आज जगासमोर असलेल्या प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे प्रदूषण. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमधून निघणारा धूर या प्रदूषणाचं मुख्य कारण आहे. वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे लोकांनाही अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातासहित देशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषण गंभीर समस्या बनत चालली आहे. या समस्येवर तोडगा काढत पश्चिम बंगाल सरकारने बायोगॅसवर धावणा-या बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे.
बायोगॅसवर धावणा-या एकूण 12 बसेस येणार आणण्यात असून 12 वेगवेगळ्या मार्गांवर त्या धावतील. पहिली बस 17.5 किमी अंतराच्या उल्टाडांगा-गरिया दरम्यान धावेल.
प्रत्येक बससाठी एकूण 18 लाखांचा खर्च -
प्रत्येक बसच्या निर्मितीसाठी एकूण 18 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. कच-यातून निर्माण करण्यात येणा-या इंधनावर ही बस चालेल. एक किलो बायोगॅसवर बस 20 किमी मायलेज देईल. एक किलो बायोगॅससाठी फक्त 30 रुपयांचा खर्च असेल.
बसमधील प्रवाशांना किमान एक रुपया भाडं आकारलं जाणार आहे. दुसरीकडे महानरपालिकेच्या डिझेलवर धावणा-या बसेसमध्ये सहा रुपये किमान भाडं आकारलं जात आहे.
विरभूम येथील दुबराजपुरमधील बायोगॅस प्लांटमध्ये टँकरच्या सहाय्याने गॅस कोलकातामध्ये आणला जाईल. यासाठी 10 पंप लावण्याची मंजूरी मिळाली आहे.
या देशांमध्ये धावतात बायोगॅसवरील बसेस -
जर्मनी, स्वीडनमधील स्टॉकहोम, सिंगापूरमधील शहरांमध्ये बायोगॅसवरील बसेस चालतात.