वडोदरा - कुठल्याही लग्नसोहळ्यात नवरदेव आणि नवरी असणं गरजेचे असते. परंतु गुजरातच्या वडोदरा येथे होणाऱ्या एका अनोख्या लग्नाची देशभर चर्चा सुरू आहे. याठिकाणी क्षमा बिंदू नावाच्या युवतीचं लग्न सर्वांसाठी हैराण करणारी घटना ठरत आहे. येत्या ११ जूनला क्षमाचं लग्न होणार आहे. या लग्नासाठी मंडप सजला, पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. सगळंकाही उत्साहात पार पडत आहे. पण यात असा एक महत्त्वाचा व्यक्ती नसणार हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
या लग्नात चक्क नवरदेव नसणार आहे. कारण क्षमा बिंदू(kshama bindu) ही स्वत:शीच लग्न करणार आहे. या लग्नाला सोलोगॅमी असं म्हटलं जाते. जे देशात पहिल्यांदाच होणार आहे. नवरीच्या रुपात नटून थटून मंडपात बसणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. मात्र क्षमाच्या या लग्नात पाहुणे असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळीही उपस्थित राहतील परंतु नवरा मुलगाच नसेल. या लग्नाबाबत क्षमा सांगते की, दुसऱ्या मुलीप्रमाणे माझंही नवरी बनण्याचं स्वप्न आहे परंतु मला लग्न करायचं नाही. त्यामुळे विना नवरदेव मी लग्न करण्याचा विचार केला. स्वत:प्रती असलेले प्रेम आणि स्वावलंबी हेदेखील या लग्नामागचं कारण असल्याचं म्हटलं आहे.
क्षमा म्हणाली की, मी कधीही लग्न करू इच्छित नाही परंतु मला नवरीसारखं सजायचं आहे. त्यासाठी मी स्वत:शीच लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मी ऑनलाइन याबाबत शोध घेतला. देशात कधी कुणी असं केले आहे का? परंतु काहीच सापडलं नाही. त्यामुळे कदाचित स्वत:शीच लग्न करणारी मी देशातील पहिली युवती ठरणार असल्याचं तिने सांगितले. इतकेच नाही तर या लग्नाची सर्व तयारी झाली आहे. ११ जूनला एका मंदिरात हे लग्न पडणार आहे. त्यात ५ शपथ घेतल्या जातील.
क्षमाने लग्नानंतर हनीमूनसाठी जाण्याचाही प्लॅन बनवला आहे. लग्नासाठी क्षमाने गोवा निवडलं आहे. क्षमाच्या या निर्णयामुळे सगळेच अचंबित आहे. परंतु तिच्या घरच्यांनी क्षमाच्या निर्णयावर कुठलाही आक्षेप घेतला नाही. क्षमाच्या निर्णयाला आई वडिलांनीही पाठिंबा दिला. आत्मविवाह काहीजण अनैसर्गिक मानतात. परंतु वास्तविक मी जे काही करत आहे ते महिलांसाठी महत्त्वाचं आहे. माझे आई वडील खुल्या विचारांचे आहेत. त्यांनी लग्नासाठी मला आशीर्वाद दिल्याचं क्षमा बिंदूने सांगितले.
पाश्चात्य देशात सुरू झाला ट्रेंडभारतात क्षमाच्या निमित्ताने असं लग्न पहिल्यांदाच होत असले तरी पाश्चात्य देशात हा ट्रेंड आधीच सुरू झाला आहे. अमेरिकेत हे पहिल्यांदा झाले. १९९३ मध्ये लिंडा बारकर यांनी स्वत:शी लग्न केले होते. त्यांच्या लग्नात ७५ पाहुण्यांना आमंत्रित केले होते सर्व विधी पार पडल्या होत्या.