वाराणसी: उत्तर प्रदेशातील वारासणीमध्ये वास्तव्यास असलेल्या कुसुमावती देवी यांना वाळू खाण्याची सवय आहे. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील त्यांची सवय कायम आहे. त्या दररोज नाश्ता करतात, जेवतात. पण वाळू खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. गेल्या ६५ वर्षांपासून त्या वाळू खात आहेत. विशेष म्हणजे वाळू खाल्ल्यानंतरही त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
चोलापूरच्या कटारी गावात राहात असलेल्या कुसुमावती वयाच्या १५ व्या वर्षापासून वाळू खात आहेत. १५ वर्षांच्या असताना त्यांना पोटदुखीचा त्रास झाला. त्यावेळी एका वैद्यानं कुसुमावती यांना गायीच्या दुधातून वाळू पिण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुसुमावती यांची पोटदुखी थांबली. मात्र तेव्हापासून कुसुमावती यांना वाळू खाण्याची सवय लागली.
कुसुमावती वाळू स्वच्छ पाण्यानं धुतात. त्यानंतर ती सुकवतात आणि मग ती खातात. कित्येक वर्षांपासून कुसुमावती वाळू खात आहेत. त्यामुळे आता कुटुंबीयांनी विरोध करणंही सोडून दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त करत वाळू न खाण्याचा सल्ला दिला. पोटदुखी किंवा पोटाचे इतर आजार वाळूनं दूर होतात हा गैरसमज आहे. आयुर्वेदात अशी कोणतीही उपचार पद्धती नाही. वाळूमुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पचनतंत्र कमजोर होतं, असं बीएचयूमधील डॉ. सुशील दुबे यांनी सांगितलं.