काही जण जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात. फास्टफूड खाण्याचे खूप जण शौकीन असतात. खाण्यासाठी ते विविध ठिकाणांना नेहमीच भेट देतात. अशीच काहीशी घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात कडक नियम लागू असताना आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 160 किलोमीटर प्रवास केला आहे. बर्गरसाठी महिलेने हा प्रवास स्कूटीने केला आहे. मात्र बर्गर खाणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. कारण यासाठी तिला शे, बाराशे नाही तर तब्बल 20 हजार मोजावे लागले आहेत.
कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. अशातच इंग्लंडमध्ये एका महिलेला लॉकडाउनच्या काळात बर्गर खाण्याची खूप इच्छा झाली. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने बहिणीसह स्कूटीने तब्बल 160 किलोमीटर अंतर पार केलं. मात्र यासाठी पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आहे. त्यांना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.
महिलेन बर्गर खाण्यासाठी आपल्या बहिणीसोबत स्कूटीने लिंक ऑल शाइन येथून स्कार्बरोपर्यंतचा प्रवास केला. फक्त बर्गर खाण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात 160 किलोमीटर प्रवास करणं अनावश्यक असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली आहे. चीफ इन्स्पेक्टर रिकेल वुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना बाहेर फिरण्याची इच्छा आहे हे समजू शकतं पण कोरोना महामारी संपल्यानंतर त्यांनी फिरावं. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये थांबलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.