ऑनलाइन लोकमत -
मेरठ, दि. 24 - पाकिस्तानमधील आपलं पुर्वजांच घर पाहण्याची भारतीयाची शेवटची इच्छा पाकिस्तान सरकारच्या मदतीने पुर्ण होणार आहे. 91 वर्षीय कृष्णा खन्ना यांचं घर पाकिस्तानात असून फाळणीनंतर ते भारतात आले होते. मृत्यूपुर्वी आपल्याला ते घर पाहायला मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. गेली 10 वर्ष ते व्हिसासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना व्हिसा मिळत नव्हता. अखेर पाकिस्तान सरकारने त्यांची ही शेवटची इच्छा पुर्ण करण्याचा निर्णय घेत त्यांना व्हिसा दिला आहे.
91 वर्षीय कृष्णा खन्ना यांचं बालपण पाकिस्तानमधील उढोके येथे गेलं आहे. 1930 च्या आसपासचा तो काळ असावा. तिथे आपल्या आजोबांसोबत घालवलेले दिवस, आठवणी अजूनही त्यांच्या मनात तशाच ताज्या आहेत. चांगल्या आठवणींसोबत काही भयानक आठवणीदेखील आहेत. 1947ला फाळणीअगोदर दंगली झाल्या तेव्हा सुरक्षेसाठी कृष्णा खन्ना यांचं कुटुंब उढोके येथून शेखूपुरा येथे गेलं होतं. गुरुद्वारामध्ये त्यांनी आसरा घेतला होता. बाहेर हातात तलवारी, हत्यारे घेऊन रक्ताने माखलेली लोक फिरत होते. कृष्णा खन्ना यांच्या कुटुंबावर हल्ला होणार होता पण तितक्यात लष्कराच्या जवानांनी त्यांना येऊन वाचवलं होतं.
'माझ्या मनात कोणताही राग नाही आहे. दोन्ही देशांना सहन करावं लागलं आहे. पाकिस्तानमधील माझं पुर्वजांचं घर फक्त मला एकदा पाहायचं आहे, हीच माझी शेवटची इच्छा आहे', असं कृष्णा खन्ना सांगतात. कृष्णा खन्ना गेली 10 वर्ष व्हिसासाठी प्रयत्न करत होते. पण प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली. पण अखेर पाकिस्तान सरकारने त्यांना व्हिसा देत त्यांची शेवटची इच्छा पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारने फक्त कृष्णा खन्नाच नाही तर त्यांच्यासोबत येण्यासाठी अजून तिघांना व्हिसा दिला आहे. यामध्ये त्यांचा 80 वर्षाचे भाऊ जगदीश हेदेखील आहेत.
पाकिस्तान सरकारने व्हिसा दिल्याची बातमी कळताच कृष्णा खन्ना यांना भावना अनावर झाल्या होत्या. 'आम्ही सकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवतो. वृद्ध व्यक्तीला व्हिसा देणं हे आमच्याकडून सकारात्मक पाऊल असल्याचं', प्रेस मिनिस्टर मनझूर अली मेमन यांचं म्हणण आहे.