नवी दिल्ली-
एक दिवस तुमचा बॉस तुम्हाला म्हणाला की चला मी सर्व कर्मचाऱ्यांना एका निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकला घेऊन जातोय...तेही माझ्या खर्चानं. जिथं रॉयल रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, खाण्याची चंगळ अन् जवळच खळखळणारा धबधबा आहे. विशेष म्हणजे तिथं जाऊन ऑफीसचं काम केल्याबद्दल तुम्हाला त्याचे पैसेही दिले जाणार असतील तर? ऐकून काहीसं अशक्य वाटेल पण हे खरंच घडलं आहे. एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चक्क परदेश टूरचं नियोजन केलं.
एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या बॉसनं आपल्या संपूर्ण टीमला वर्किंग हॉलीडे अंतर्गत इंडोनेशियातील लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन असलेल्या बाली येथे पिकनिकला नेलं. सिडनी स्थित Soup Agency या मार्केटिंग कंपनीच्या बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लग्जरी विला बूक केला होता. या विलामध्ये सर्व सुखसोयी आणि मनोरंजनाची व्यवस्था होती. पिकनिकमध्ये कर्मचाऱ्यांचे टीम-बॉन्डिंगशी निगडीत काही खेळही घेण्यात आले. विलामधील स्विमिंगपूलमध्ये कर्मचाऱ्यांची धमला असो कींवा मग क्वाड बाइक रायडिंग. आपल्या टीममध्ये उत्तम ताळमेळ आणि खेळकर वातावरण राहील या उद्देशानं बॉसनं केलेल्या प्रयत्नांचं सोशल मीडियात जाम भारी कौतुक होत आहे.
Soup कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कात्या वकुलेंको यांनी १४ दिवसांसाठीचं वर्क-ट्रीपचं आयोजन केलं होतं. ते म्हणतात की, कामाच्या ठिकाणी एक चांगलं वातावरण राहावं आणि टीममध्ये काम करणारे सर्वजण एकत्र आहेत. एकजूट आहे. यासाठी अशा पिकनिकचं आयोजन करणं महत्वाचं वाटतं.
"कोरोनानं आपल्याला काम करण्याच्या नव्या पद्धती शिकवल्या आणि आपण आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून काम करू शकतो. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की याला आता आणखी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे", असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले.
वर्किंग हॉलीडेच्या फुटेजमध्ये कर्मचारी फ्रेश सीफूड एन्जॉय करताना दिसले. तसंच या ट्रिपमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल योगा क्लासपासून ते सनराइज ट्रेकचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांची विलामध्येच मिटिंग होत होती आणि कर्मचाऱ्याला कुठंही बसून, कॉकटेलचा आनंद घेत काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या या अनोख्या योजनेचं कौतुक केलं आणि टीममध्ये यामुळे संवाद वाढल्याचाही भावना व्यक्त केली.