आज २९ फेब्रुवारी आहे, ही तारीख आता ४ वर्षांनंतर पुन्हा कॅलेंडरमध्ये दिसणार आहे. सध्या प्रचलित असलेल्या पंचागामध्ये महिन्याचे ३० किंवा ३१ दिवस असतात. तर फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस असतात. पण ४ वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये २९ तारीखही असते. या दिवसाला लोक आगळावेगळा दिवस मानतात. तसेच त्या दिवशी काही ना काही विशेष करतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात दर चार वर्षांनी एकदा एक अतिरिक्त दिवस का जोडला जातो. त्यामागे नेमकं काय गणित आहे, त्याची गरज का भासली, हे तुम्हाला माहिती आहे का? या मागचं कारण आज आपण जाणून घेऊयात.
आपली पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घातले. त्यासाठी ३६५ दिवस ५ तास, ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद एवढा वेळ लागतो. मात्र ग्रेगरियन कॅलेंडरच्या हिशोबाने वर्षाचे ३६५ दिवसच निश्चित करायचे होते. त्यामुळे दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो. सौर वर्ष आणि कॅलेंडर वर्ष यामधील दिवसांचं अंतर कमी करण्यासाठी ४ वर्षांपर्यंत दरवर्षी ६ तास जोडले जातात. त्यामुळे चार वर्षांमध्ये एकदाच लीप वर्ष येतं. त्यात एक दिवस जोडल्याने वर्षाचे दिवस ३६६ एवढे होतात. यालाच लीप वर्ष असं म्हटलं जातं.
कॅलेंडर वर्षानुसार एक वर्ष हे ३६५ दिवसांमध्ये पूर्ण होते. तर सौर वर्ष हे ३६५ दिवस आणि सुमारे सहा तासांमध्ये पूर्ण होते. नासाच्या मते एका वर्षामध्ये सहा तास हे काही फार महत्त्वाचे नसतात. मात्र दीर्घकालीन हिशेबामध्ये ते खूप महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात सन १५८२ मध्ये झाली होती. त्यापूर्वी रशियातील ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होते. त्या कॅलेंडरमध्ये वर्षाचे १० महिने होते. तसेच नाताळाचा एक दिवस निश्चित नव्हता. नाताळाच्या सणाचा एक दिवस निश्चित करण्यासाठी अमेरिकेतील एलॉयसीस लिलिअस याने ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात केली होती. या कॅलेंडरनुसार जानेवारी वर्षाचा पहिला महिना तर डिसेंबर हा शेवटचा महिना म्हणून निश्चित करण्यात आले. तसेच या कॅलेंडरमध्ये २५ डिसेंबर ही तारीख नाताळासाठी निश्चित करण्यात आली. मात्र जेव्हा हे खूप संशोधन करून निष्कर्ष काढण्यात आला, तेव्हा प्रत्येक ४ वर्षांनंतर वर्षामध्ये १ अतिरिक्त दिवस जोडला तर ५ तास ४८ मिनिटे आणि ४९ सेकंदांचा वेळ भरून निघेल असा तोडगा समोर आला. त्यानुसार ४ वर्षांनंतर एका वर्षाचे ३६६ दिवस असतील तर इतर वर्ष ही ३६५ दिवसांची असतील, असे निश्चित करण्यात आले.