ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 21 - पावसाळा सुरु झाला की पावसासोबत आजारही सुरु होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अमेकदा दवाखान्याचा दौरा करावा लागतो. पावसाळ्यात होणा-या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. पावसाळ्यात होणारे बरेच आजार पोटामुळे निर्माण होतात आणि पोटाचे आजार जंतूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार यातून निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. यासंबंधात काही खास टिप्स् तुमच्यासाठी...
१) पावसाळ्यात निरनिराळ्या भाज्यांचे सूप प्राशन करणे फायदेशीर ठरते. कारण या सुपांमध्ये पोषण मूल्ये भरपूर असतात. काही पोषण मूल्यांच्या अभावामुळे सर्दी आणि फ्ल्यूसारखे आजार बळावतात. परंतु भाज्यांचे सूप प्यायल्ल्याने या आजारापासून बचाव तर होतोच, पण आपले सर्वसाधारण आरोग्य आणि प्रतिकार क्षमता वाढते.
२) पावसाळ्यात चहा घ्या, परंतु शक्यतो हर्बल टी प्या. त्यामुळे फ्ल्यूचा धोका टळतो. हर्बल टी पचनशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आपल्या जेवणामध्ये पातळ अन्नापेक्षा घट्ट अन्न पदार्थ किंवा निमपातळ अन्नपदार्थ जास्त घ्यावे. कारण पातळ अन्न पदार्थातून रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
३) पावसाळ्यात फळांचे किंवा भाजीपाल्यांचे रस पिण्याचे कटाक्षाने टाळा. विशेषत: पाऊस पडत असताना रस्त्यावरच्या गाड्यावरचे किंवा हॉटेलमधले फळांचे रस पिऊ नका. रस पिण्याची फारच लहर आली असेल तर घरी तयार करून प्या.
४) मासे आणि तत्सम प्राणी खाऊ नका. कारण पावसाळा हा त्यांच्यासाठी प्रजननाचा काळ असतो. त्या अवस्थेतील मासे खाल्ल्यास पोटदुखीचा विकार होण्याची शक्यता असते. त्यातून विषबाधा सुद्धा होते.
५) पावसाळ्यामध्ये सलाड किंवा कच्च्या भाज्या असा रॉ फूडचा प्रयोग करू नका. कारण त्यातून कावीळ, टायफाईड असे विकार उद्भवू शकतात. हेच अन्न शिजवून खाल्ल्यास शिजवताना त्यातील रोगजंतू मरतात आणि त्यांच्यापासून धोका टळतो.