करुर – कॉलेज प्रोफेसरची नोकरी सोडून ही व्यक्ती मासे विकू लागली हे ऐकून धक्का बसला ना! सामान्य नोकरदार वर्ग महिन्याला येणाऱ्या कमाईवर आपलं घर चालवतो, अशात जर नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार खूप कमी लोक करतात. व्यवसाय केला तर आपल्याला त्यात यश मिळेल की नाही? नोकरी सोडणं धोक्याचं होईल असा विचार मनात येत राहतो.
शाहरुख खानच्या सिनेमातील एक डायलॉग आहे ‘कोई धंधा छोटा नही होता और धंधे से बडा कोई धर्म नही होता’ त्यासाठी कामाशी प्रामाणिक असणं गरजेचे आहे. ही कहाणी आहे २७ वर्षीय मोहन कुमार याची. तामिळनाडू येथील करुर येथे मोहन कुमार आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या कुटुंबाचा फिश कोल्ड स्टोरेजचा कौटुंबिक व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मोहन कुमार याने कॉलेजमधील प्रोफेसरची नोकरी सोडून दिली.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मोहनने मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर मोहन कुमार एका खासगी कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला. मात्र नोकरीसोबत त्यांनी घरातल्या मासेविक्रीच्या व्यवसायाकडेही लक्ष दिलं. मोहनचे आई-वडील पलानीवेल आणि सेल्वारानी या गांधीग्राम येथे फिश फ्राईचं दुकान चालवतात. कॉलेजला असताना मोहन कॉलेज सुटल्यावर दुकानात येऊन आई-वडिलांच्या कामात मदत करायचा. मात्र मोहनच्या या कामामुळे आई-वडील नाराज होत असे.
मोहनने कौटुंबिक व्यवसायात न येता जीवनात मोठं काम केलं पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करावीत अशी आई-वडिलांची इच्छा होती. इंजिनिअरींग केल्यानंतर मी मासांचा व्यवसाय करु लागलो तेव्हा अनेक लोक मला मुर्ख बोलायचे. मात्र मी माझ्या नोकरीपेक्षा या कामावर जास्त प्रेम करतो असं मोहनने सांगितले. जेव्हा मोहनची आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळली होती त्यावेळी दुकान बंद करावं लागलं होतं. पण या व्यवसायामुळे त्यांना आर्थिक उभारी मिळाली. मला या व्यवसायात अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या. तेव्हा माझे कुटुंबानेही साथ दिली नाही. मात्र आता मोहन करुर येथील हॉटेल्स आणि छोट्या दुकानांमध्ये दोन ते तीन टन मासे आणि मीठ उपलब्ध करुन देतो. या कामातून त्याला महिनाकाठी १ लाख रुपये फायदा होतो. हा व्यवसाय मोहनला आणखी वाढवायचा आहे असं त्याने सांगितले.