भावाभावातील भांडणं, एकमेकांना शह देण्यासाठी केले जाणारे उद्योग, अरे तो मला काय शिकवतो म्हणत दिलं जाणारं ज्ञान, उपदेशाचे डोस आपल्याला नवीन नाहीत. भाऊबंदकीच्या एकापेक्षा एक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण लेबनॉनमधल्या दोन भावंडांच्या भांडणातून जे घडलं, त्याची आज जगात चर्चा आहे. मला थोडं कमी मिळालं तरी चालेल, पण त्याला धडा शिकवणारच, असं म्हणत एका भावानं दुसऱ्या भावानं घर बांधलं. तब्बल ६६ वर्षांपूर्वी बांधलेल्या घराची कहाणी आता समोर आली आहे.१९५४ मध्ये बैरुतच्या शेजारी असलेल्या मनारामध्ये एका व्यक्तीनं देशातील सर्वात अरुंद इमारत बांधली. या घराला स्थानिक भाषेत अलबासा असं म्हणतात. अरबी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो द्वेष, असूया. या घराला अलबासा म्हणण्यामागचं कारणदेखील विशेष आहे. भावाच्या घरातून समुद्र दिसू नये. सी-फेस व्ह्यूच न मिळाल्यानं त्याच्या घराची किंमत कमी व्हावी या हेतूनं दुसऱ्या भावानं त्याच्या अगदी शेजारी अतिशय कमी जागेत एक इमारत बांधली.भावाला सी-फेस व्ह्यू मिळू नये म्हणून दुसऱ्या भावानं बांधलेल्या इमारतीची रुंदी एका टोकाला केवळ २ फूट इतकी आहे. तर मध्यभागी ती १४ फूट इतकी आहे. वडिलांच्या संपत्तीची वाटणी झाल्यावर एका भावाला प्राईम लोकेशनवर मोठी जागा मिळाली. तर दुसऱ्याला त्याच ठिकाणी अतिशय कमी जागेवर समाधान मानावं लागलं. दोन भावांमध्ये टोकाचा वाद होता. या घटनेमुळे तो आणखी वाढला. कमी जागा मिळालेल्या भावाला कोणत्याही मार्गानं बदला घ्यायचा होता.यानंतर दुसऱ्या भावानं त्याला मिळालेल्या अतिशय कमी जागेत इमारत बांधायचं ठरवलं. खरंतर या भागात केवळ एक भिंत उभी राहून थोडी जागा शिल्लक राहील इतकीच जमीन होती. त्यामुळे इमारत उभी राहिली, तरीही त्यातल्या खोल्या अतिशय लहान असणार होत्या. मात्र भावाला त्याच्या घरातून समुद्राचा नजारा मिळणार नाही, या हेतूनं दुसऱ्यानं इमारत उभी केली. देशातील सर्वात अरुंद इमारत म्हणून तिची नोंद झाली. स्थानिकांना ही इमारत उभारण्यामागचं कारण माहीत होतं. मात्र जगाला त्यामागचं कारण आता समजलं आहे.
भावा, तू समुद्र कसा बघतो, तेच मी बघतो; भांडणं टोकाला गेली अन् भावड्यानं 'लय भारी' बिल्डिंग बांधली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 3:50 PM