ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ११ - सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवडयामुळे प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने सुट्टे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालच्या अलीपोरमध्ये एका रुग्णाने चक्क ४० हजार रुपयांचे बिल चिल्लरमध्ये भरुन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवला. सुकांता छाऊले असे या रुग्णाचे नाव आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डेंग्युने आजारी असलेल्या सुकांताला न्यू अलीपोरच्या बीपी पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रुग्णालयाने सुकांताच्या डिस्र्चार्जसाठी कुटुंबियांना ४० हजार रुपयांचे बिल जमा करण्यास सांगितले. या कुटुंबाकडे ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा असल्यामुळे बिल चुकवायचे कसे असा प्रश्न या कुटुंबियांसमोर होता.
त्यांनी रुग्णालयाला जुन्या नोटा स्वीकारण्याची विनंती केली. पण रुग्णालयाने नकार दिला. त्यांनी चेकचा पर्यायही दिला पण तो ही रुग्णालयाने मान्य केला नाही. अखेर छाऊले कुटुंबाने व्हॉटसअॅपवरुन नातेवाईक, मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि ४० हजार रुपयांची नाणी जमा झाली.
त्यांनी ४० हजाराची ही नाणी एका पिशवीत जमा केली व ती बॅग घेऊन रुग्णालयात आले. नाण्यांची थैली बघून रुग्णालयाला धक्का बसला. त्यांनी चिल्लरमध्ये बिल स्वीकारण्यासही नकार दिला. त्यावेळी छाऊले कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर नरमलेल्या रुग्णालय प्रशसनाने ती नाण्यांची थैली स्वीकारली. सहा स्टाफ सदस्यांनी तब्बल तीन तास बसून ही नाणी मोजली. दुपारी तीन वाजता सुकांताला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.