राजकोट : गरोदर स्त्रीची प्रसूतीची वेळ जवळ आली की तिच्यासकट तिचे सारे नातेवाईकही भांबावून जातात. कित्येकदा रेल्वेत, स्टेशनवर, विमानात प्रसूती झाल्याच्या घटना आपण अनेकदा वाचल्या आहेत. पण सर्र्वाना आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना बुधवारी राजकोटमध्ये घडली. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावात एका महिलेची प्रसूती झाली, तेव्हा तिच्या आसपास सिंहांनी गराडा घातला होता. बुधवारी त्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना गावापासून जेमतेम तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात रुग्णवाहिकेला सिंहाच्या कळपाने घेरले. त्या कळपात १0-१0 तरी सिंह होते. इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स सेवेचे अमरेली जिल्हाप्रमुख चेतन गढिया म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. सिंहाचा तो कळप तिथून हलतच नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसूती वेदनेसह रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतच त्या महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन २५ मिनिटांत त्या महिलेची प्रसूती करण्यात यश मिळवले. महिलेची प्रसूती सुरू असताना सिंह रुग्णवाहिकेच्या आगे-मागे फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने रुग्णवाहिका सावकाश पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहदेखील तिथून हलले आणि काही मिनिटांत रस्त्यापासून दूर आत निघून गेले. त्या महिलेला आणि बाळाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती उत्तम आहे. (वृत्तसंस्था)
महिलेच्या प्रसूतीच्या वेळी सिंहांचा गराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2017 12:40 AM