कोरोना व्हायरसचं थैमान थांबायचं नाव घेत नाहीये. अशात लॉकडाऊनमुळे अनेक देशांमधील लोकांना घरातच रहावं लागत आहे. लोकांपर्यंत दूध, भाजी अशा जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. काही लोक बाहेर जाऊन या वस्तू घेऊन येत आहेत. पण ज्यांना बाहेर जाता येत नाही अशा वयोवृद्धांचं काय? तर अशांसाठी तुर्कीमध्ये एक सुपरहिरो समोर आला आहे. या सुपरहिरोचं नाव आहे बुराक सोयलू. बुराक स्पायडरमॅन बनून वयोवृद्धांपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचवत आहे.
Goodable ने खऱ्या आयुष्यातील या स्पायडरमॅनची कहाणी जगासमोर आणली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'तुर्कीतील बुराक सोयलू स्पायडरमॅन बनून वयोवृद्ध लोकांपर्यंत भाजी, दूध आणि इतर गरजेच्या वस्तू पोहोचवतो. तो त्याच्या बीटल कारमध्ये फिरत असतो. जेव्हा त्याला असं करण्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, 'माझी सुपरपॉवर शेजाऱ्यांसाठी चांगली आहे'.
@serhanbilgin या यूजरने बुराकचे आणखी काही फोटो शेअर केले आणि पोस्टवर लिहिले की, 'तुम्ही त्याचे काही बेस्ट फोटो शेअर करणं विसरले आहात, जे इथे आहेत'. सोशल मीडियात या रिअल लाईफ स्पायडीची चांगलीच चर्चा होत आहे. Goodable च्या पोस्टला साधारण 10 हजार लाइक्स आणि 3 हजारपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.