नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांच्या पोटावर पाय आला आहे. कमाईचं साधन बंद झाल्याने अनेकांनी घरी परतण्यासाठी संघर्ष सुरु केला आहे. यामध्ये काहींनी मुलाबाळांसह हजारो किमी पायपीटही सुरु केली आहे. काहींचा रस्त्याने पायपीट केल्याने जीव गेल्याचंही समोर आलं आहे.
गरीब मजूर घरी परतण्यासाठी संघर्ष करत असताना काहींना जुगाड बनवून कुटुंबासोबत गावी जाण्याचा मार्ग शोधला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत घरी पोहोचण्यासाठी केलेली कल्पना आश्चर्यचकित करणारी आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने आपल्या कुटूंबासह घरी पोहोचण्यासाठी बाईकला पाळणा जोडला आहे. यासह त्याने दुचाकीला ४ सीटर जुगाडगाडी तयार केली आहे. व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने बाईक आणि पाळण्याला एका स्टेअरिंगने जोडलं आहे. तो स्टेअरिंगच्या सहाय्याने पाळणा आणि बाईकचा समतोल राखत रस्त्याने पुढे जात आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे.
मारिको कंपनीचे चेअरमन हर्ष मारीवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात लिहिलं आहे की, बहुदा हे प्रवास करण्यासाठी सुरक्षित नाही पण त्याने २ सीटरला ४ सीटर कारमध्ये बदललं आहे. या जुगाडाबद्दल लोकांनी त्याचे कौतुक केलं आहे. अशा लोकांचा वापर देशाचं तंत्रज्ञान पुढे घेऊन जाण्यासाठी करायला हवं असं मत लोकांनी व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ देशातील कोणत्या ठिकाणचा आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.