लक्झरी कार्सबाबत जाणून घेण्याची क्रेझ नसणारे क्वचितच कुणी आढळतील. या कार खरेदी करता येत नसतील तरी त्याबाबत जाणून घेणे अनेकांना आवडतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज जगातल्या सर्वात लांब आणि सर्वात लक्झरी कारबाबत सांगणार आहोत.
आम्ही ज्या कारबाबत तुम्हाला सांगणार आहोत ती कार आहे लिमोजीन कार. आज या कारची अवस्था जरी वाईट असली तरी ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेते. जगभरात अनेक कंपन्या लिमोजीन कार तयार करु शकतात. कारण लिमोजीन ही कंपनी नसून कारची एकप्रकारची स्टाइल किंवा कारचं व्हेरिएंट आहे. ही कार कोणतीही कंपनी केवळ ऑर्डर दिल्यावरच तयार करुन देते. या कारमध्ये काय कसं डिझाइन करायचं आहे हे ग्राहकांनी सांगायचं असतं.
आज आपण जगातल्या सर्वात लांब लिमोजीन कारबाबत जाणून घेणार आहोत. फोटोमध्ये जी कार दिसत आहे, या कारला 'अमेरिकन ड्रीम' असं नाव देण्यात आलं आहे. आणि जगातली सर्वात लांब कार असल्याचा वर्ल्ड रेकॉर्डही याच कारच्या नावावर आहे. या कारच्या इंटेरिअरबाबत सांगायचं तर ही कार आतून एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखी वाटेल. आश्चर्याची बाब म्हणजे ही कार इतकी मोठी आहे की, यावर एक हेलिकॉप्टरही लॅन्ड केलं जाऊ शकतं.
ही कार साधारण १०० मीटर लांब आहे आणि या कारमध्ये केवळ हेलिपॅडच नाही तर एक स्विमिंग पूलही आहे. हेलिकॉप्टर लॅन्ड करण्यासाठी या गाडीला २६ टायर लावण्यात आले आहेत. जेणेकरून या कारवर हेलिकॉप्टरचं वजन पेलू शकेल. कारच्या मागच्या बाजूला एक स्विमिंग पूलही असून आराम करण्यासाठी एक बेडही आहे.
१९८० च्या दशकात तयार करण्यात आलेल्या या कारचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. या कारची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ही कार पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी चालवली जाऊ शकते.
या कारमध्ये ड्रायव्हिंगसाठी दोन कॅबिन तयार करण्यात आले आहेत. कारमध्ये दोन इंजिन लावण्यात आले आहेत. ही कार लांब असली तरी वेगाने चालवणे शक्य तर आहे. पण सहजासहजी या कारला वळवणे जरा कठिण आहे.
आता ही कार फारच वाईट अवस्थेत आहे. या कारच्या खिडक्या आणि छप्पर तुटलं आहे. आता या कारची पुन्हा डागडुजी करण्याचा विचार सुरु आहे.