लुधियाणा : गियर सायकल, रेसर सायकल, घरगुती सायकल असे सायकलचे अनेक प्रकार आतापर्यंत लोकांनी पाहिले आहेत. पण लाकडी सायकल ती सुद्धा 100 वर्षे जुनी. हे वाचून आश्चर्यकारक वाटत असेल. विशेष बाब म्हणजे तेव्हाही सायकलिंगसाठी सरकारी परवानगी घ्यावी लागली होती आणि त्या सायकलचा परवाना बनवण्यात आला होता. (ludhiana 100 year old bicycle is made of wood bid 50 lakh rupees)
भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी लाकूड आणि लोखंडापासून बनवलेली ही एक अनोखी सायकल आहे, जी सुमारे 100 वर्षे जुनी आहे. ही पाहणे म्हणजे एकप्रकारे आश्चर्यकारक आहे. कदाचित पंजाबमध्येच अशी एक सायकल असेल, तिला पाहण्यासाठी लोक लांबून येतात. ही अनोखी सायकल खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीने 50 लाख रुपयांची बोली केली होती. मात्र, या सायकल मालकाने ती विकले नाही.
सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले की, ही सायकल त्यांच्या वडिलांनी जवळच्या गावात राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याकडून खरेदी केली होती. त्या वेळी सायकल चालवण्यासाठी परवानाही बनवण्यात आला होता, जो सध्या त्यांच्याकडे आहे. हा परवाना त्याच्या काकांच्या नावे होता. ज्यावेळी लोक सायकल पाहण्यासाठी येतात, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे ही सायकल अजूनही चालवता येते.
याचबरोबर, ही सायकल खरेदी करण्यासाठी परदेशातून एक व्यक्ती आली होती. या व्यक्तीने सायकल विकत घेण्यासाठी तिची किंमत 50 लाख रुपये ठरवली होती. पण आम्ही सायकल विकली नाही, कारण छंदाला किंमत नसते, असे सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त हिंदी वेबसाइट 'आजतक'ने दिले आहे.