मदुराई, दि. 31 - तामिळनाडूमधील मदुराई शहरात एक 70 वर्षीय व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून फक्त 10 रुपयांत पोटभर जेवण देत आहे. शहरातील अण्णा बस स्टँडजवळ रामू यांचं हॉटेल आहे. त्यांच्या या भल्या स्वभावाचं लोकांकडूनदेखील कौतुक होत असून त्यांचा आदर करतात. लोक त्यांना प्रेमाने 'रामू ताता' म्हणून हाक मारतात. रामू 14 वर्षांचे असताना आपल्या घरातून पळून आले होते. तेव्हापासून ते मदुराई येथेच राहतात.
मदुराई येथील एका मठमध्ये तेथील गरिब लोक ज्यांच्याकडे एकावेळच्या अन्नासाठीही पैसे नाहीत ते जेवण्यासाठी येत असत. त्याचठिकाणी 1967 मध्ये रामू आणि त्यांच्या पत्नीने एक दुकान भाड्याने घेतले. रामू यांनी तिथे हॉटेलचा व्यवसाय सुरु केली. त्यावेळी रामू यांनी हॉटेलमध्ये इडली, डोसा सारखे पदार्थ ठेवले होते. यापैकी कोणताही पदार्थ घेतल्यास ते फक्त 10 रुपये घेत असत. 10 रुपयांत तीन इडल्या मिळत असल्याने लोकांचीही चांगली गर्दी होत होती.
ब्रेकफास्टशिवाय रामू यांनी हॉटेलमध्ये लंचची व्यवस्थादेखील केली आहे. विशेष म्हणजे जेवणासाठीही फक्त 10 रुपये आकारले जातात. त्यांच्या हॉटेलमध्ये रोज जवळपास 300 लोक जेवण्यासाठी येतात. जर एखाद्या दिवशी अन्न संपलं तर ग्राहकांना पैसे देऊन दुस-या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यास ते सांगतात.
इतकंच नाही तर रामू आपल्या कमाईतील काही भाग हॉटेलमध्ये काम करणा-या कामगारांसोबत शेअर करतात. सोबतच त्यांना कामाचा मोबदलाही देतात. पण इतक्या कमी दरात जेवण देत असल्याने त्यांची इतकी चांगली कमाई होत नाही. पण जितकी कमाई होते, त्यातील काही भाग ते आपल्या कामगारांसोबत न चुकता शेअर करतात.
2005 मध्ये रामू यांच्या पत्नीचं निधन झालं. मृत्यूपुर्वी त्यांनी सामान्य आणि गरिब माणसांची सेवा करण्याचं वचन घेतलं होतं. आपल्या पत्नीला मृत्यूपुर्वी दिलेलं हे वचन पुर्ण करण्यासाठीच रामू फक्त 10 रुपयांत जेवणाची सोय करत आहेत. ज्यांना रामू यांच्या या माणुसकीची माहिती मिळत आहे, तसंच शेजारील लोक रामू यांना मदत म्हणून हॉटेल चालवण्यासाठी देणगी देत असतात.