छतरपूर: मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये एक अजब घटना घडली आहे. मृत पावलेली एक ९६ वर्षांची व्यक्ती जिवंत झाल्याचा प्रकार छतरपूरमध्ये घडला आहे. अनेक महिन्यांपासून आजारी असलेली व्यक्ती मृत पावल्यानं कुटुंबियांनी आक्रोश केला. कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र वृद्ध व्यक्ती अचामक उठली आणि मी अद्याप जिवंत असल्याचं म्हणाली. त्यामुळे कुटुंबाला सुखद धक्का बसला आणि त्यांचा आक्रोश थांबला.
छतरपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या ९६ वर्षीय मनसुख कुशवाहा यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यांपासून फारशी बरी नाही. दिवसेंदिवस तब्येत खालावत असल्यानं त्यांना फार अशक्तपणा जाणवतो. काल मनसुख यांची हालचाल थांबली. घरच्यांनी प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरात आक्रोश सुरू झाला. मनसुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना दिली. हिंदू वैदिक पद्धतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली.
मनसुख यांच्या निधनाची माहिती समजल्यावर नातेवाईकांनी छतरपूरमधल्या त्यांच्या घरी गर्दी केली. ग्रामस्थदेखील मोठ्या संख्येनं जमले. तितक्यात मनसुख हालचाल करू लागले. मी अद्याप जिवंत आहे, असे उद्गार त्यांनी काढले. त्यानंतर जमलेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मनसुख यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सगळेजण हळूहळू घरी परतले. सध्या या घटनेची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे.
गेल्या २ वर्षांपासून मनसुख कुशवाहा यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू आहेत. पाय मोडल्यानं त्यांना चालता येत नाही. ते एका बेडवर पडून असतात. लहान मुलगा कृपाल आणि त्याचं कुटुंब मनसुख यांची काळजी घेतं. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं सध्या त्यांच्या पायावरील उपचार बंद आहेत. सध्या ते फारसं जेवतही नाहीत. त्यामुळे अशक्तपणा वाढला आहे.