ग्वाल्हेर - ग्वाल्हेर-चंबळ विभागात शनिवारी आयोजित केलेल्या महाप्रसादाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या महाप्रसादामध्ये सुमारे दोन लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, त्यासाठी पूर्वतयारी करताना जी व्यापक व्यवस्था करण्यात आली त्यावर एकवेळ विश्वास ठेवणे कठीण आहे.
हा महाप्रसाद एवढा मोठा होता की सर्वांसाठी भोजन बनवणे सोपे नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भोजन तयार करण्यासाठी मोठमोठ्या यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच प्रसादासाठी मालपोह्याचे मिश्रण काँक्रिट मिक्सरमध्ये तयार करण्यात आले. तर पुऱ्या, भाजी आणि बाकी अन्नपदार्थ नेण्यासाठी तब्बल २० ट्रॅक्टर ट्रॉलींचा वापर करण्यात आला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी तब्बल १०० गावांमधून लोक दूध, भाजी आणि पीठ घेऊन भंडाऱ्यामध्ये पोहोचले. जेव्हा भंडारा सुरू झाला तेव्हा पंगतीमध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुरैना जिल्ह्यातील क्वारी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मौनी बाबांच्या आश्रमामध्ये महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमामध्ये गेल्या एका महिन्यापासून भागवत कथेचे वाचन सुरू होते. भागवत कथेचा समारोप झाल्यावर शनिवारी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्यामध्ये भोजन तयार करण्यासाठी १२ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून पीठ आणण्यात आले. तर भाजीसाठी पाच ट्रॉलींमधून बटाटे आणि कोबी आणण्यात आले. तसेच मोठ्या लोडिंगमधून तूप आणि तेल आणण्यात आले. या महाप्रसादाची संपूर्ण व्यवस्था स्वत: जनतेने पाहिली.
महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये आसपासच्या १०० गावांमधील लोकांनी सहभाग घेतला. ते सर्वजण गावातील आश्रमाजवळ होते. त्यांनी रेशन आणि दूध जमा केले. तसेच भंडाऱ्यामध्ये या १०० गावांबरोबरच अजून काही गावांमधील लोक सहभागी झाले होते. भंडाऱ्यामधील खीर मोठ्या कढईमध्ये बनवण्यात आली. तसेच मालपोह्यांसाठीचे पीठ मळण्यासाठी कॉक्रिटच्या मशीनचा वापर करण्यात आला. तसेच हा महाप्रसाद २० ट्रॅक्टरच्या ट्रॉलींमध्ये भरून पंगतीपर्यंत पोहोचवण्यात आला.