प्रत्येकाला सेल्फी काढायला खूप आवडतो. पण हल्ली त्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. सुंदर दिसणारे कित्येक लोक सोशल मीडियाद्वारे आपापले फोटो सतत पोस्ट करत असतात. काहींनी तर त्याचे भरपूर पैसे देखील मिळतात. पण तुम्हाला जर कोणी एका सर्वसामान्य मुलाचे आंघोळ न करता काढलेले फोटो कोट्यवधी रुपयांना विकल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. आंघोळ न करता एका मुलाने पाच वर्षे फोटो काढले आणि आता पाच दिवसांत ते फोटो विकून तो करोडपती झाल्याची घटना समोर आली आहे.
घोंजाली असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मलेशियातील समेरंग सेंट्रल जावामध्ये राहतो. सध्या त्याच्याच फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या मुलाने गेली पाच वर्षे सेल्फी काढला आहे. तो दररोज झोपून उठल्यानंतर कंप्युटर स्क्रीनसमोर बसून सेल्फी काढायचा. 2017 ते 2021 अशी गेली पाच वर्ष हा दिनक्रम त्याचा सुरू होता. या फोटोंपासून त्याला एक व्हिडीओ तयार करायचा होता. पण त्याच्या या एका विचित्र छंदाने त्याला आता करोडपती केलं आहे. त्याचे हे सेल्फी कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.
घोंजालीने आपले सेल्फी NFT म्हणजे नॉन फंजीबल टोकन्समध्ये बदलले आहेत. हे ऑनलाईन करन्सीचं एक माध्यम आहे. लोक घोंजालीचे NFT खरेदी करून आपल्याकडे जमा करत आहेत. यामुळे त्याला पैसे मिळत आहेत. घोंजालीने 9 जानेवारीला आपले सेल्फी विकायला सुरुवात केली. फक्त 5 दिवसांतच आपले सेल्फी विकून तो कोट्यधीश बनला आहे. घोंजालीच्या सेल्फी विक्रीत सेलेब्सनेही मदत केली आहे. त्याच्या फोटोला इंडोनेशियातील कित्येक सेलिब्रिटींनी प्रमोट केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.