जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींचे शौकीन असतात. काही लोकांना महागड्या गाड्यांची क्रेझ असते तर काही लोकांना महागड्या कपड्यांची. असेही बरेच लोक असतात ज्यांना प्राणी पाळण्याचीही आवड असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याच्याकडे एका फार दुर्मीळ प्रजातीचा कुत्रा आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा काही हजार किंवा लाख रूपयाचं नाही तर तब्बल 20 कोटी रूपयांचं आहे.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सतीश नावाच्या या व्यक्तीने हैदराबादहून एक कुत्रा विकत घेतला. सतीश इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशन बंगळुरूचे अध्यक्ष आहे. त्यानी सांगितलं की, काही दिवसांआधी मी हैदराबादच्या मदीनागुडा येथील विश्वास पेट क्लीनिकमध्ये गेलो होतो. तिथे मला फार दुर्मीळ कोकेशियान शेफर्ड प्रजातीचा कुत्रा दिसला. त्याला बघताच मला तो आवडला. हा कुत्रा रशियन प्रजातीचा आहे. याची किंमत इतकी जास्त आहे की, यात तुम्ही 10 घरं आणि 10 रेंज रोव्हर खरेदी करू शकता.
ते म्हणाले की, मी त्याला 20 कोटी रूपयांना खरेदी केलं कारण तो सगळ्यात दुर्मीळ प्रजातीचा आहे. आजही त्याची बरोबरी करणारं कोणतंही ब्रीड नाही.सतीश यांनी सांगितलं की, 3 वर्षाच्या या कुत्र्याला मांस खायला आवतं आणि रोज तीन किलो चिकन खातो. बंगळुरु मिररच्या रिपोर्टनुसार, त्यानी याचं नाव “कॅडबॉम हैदर ” ठेवलं आहे.
आतापर्यंत त्याने जगातल्या अनेक मोठ्या डॉग शोमध्ये सहभाग घेतला आहे आणि सर्वश्रेष्ठ कुत्र्याची प्रजाती म्हणून 32 पदकं जिंकले आहेत. त्याने अनेक सिनेमातही काम केलं आहे.
सतीश याना आधीच महागडे कुत्रे पाळण्याचा शौक आहे. 2016 मध्ये सतीश भारतातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांच्याकडे दोन कोरियन मास्टीफ होते. त्यांची प्रत्येकी किंमत 1 कोटी रूपये होती. हे कुत्रे त्यांनी चीनहून मागवले होते.