जिममध्ये घाम गाळणारे लोक सध्या आरशात स्वत:ला बघून बघून नाराज झाले असतील. कारण लॉकडाऊनमुळे त्यांना नेहमीचं काहीच करता येत नाहीये. लॉकडाऊनमुळे अनेकांची बनलेली बॉडी उतरू लागली आहे.
अनेकजण घरीच फिटनेसची काळजी घेत आहेत. अशाच एका व्यक्तीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे याने पाण्याच्या आत असा काही कारनामा केला जो बाहेरही अनेकजण करू शकत नाहीत.
या व्यक्तीने पाण्यात बेंच प्रेस करण्याचा रेकॉर्ड कायम केला आहे. पण त्याने किती बेंच प्रेस मारले असतील? असा प्रश्न अनेकांना पडतोय. पण याने कमालच केली आहे. याचं नाव आहे Greg Wittstock आणि तो अमेरिकेत राहतो.
ग्रेग विटस्टॉकने हा कारनामा अमेरिकेतील इलिनोइसच्या सेंट चार्ल्स लेकमध्ये केलाय. त्याने पाण्याच्या आत केवळ 62 वेळा वजनच उचललं नाही तर जोपर्यंत टास्क संपला नाही तोपर्यंत त्याने श्वास रोखून ठेवला होता.
ग्रेग म्हणाला की, हा अनुभव भीतीदायक आणि मजेदार दोन्ही होता. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने त्याचा हा व्हिडीओ त्यांच्या पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 6 लाख लोकांनी पाहिलाय तर 8 हजार लाइक्स याला मिळाले आहेत. ग्रेगने 2019 मध्ये पाण्यात 42 बेंच प्रेस करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आता त्याने हा रेकॉर्ड आणखीनच चॅलेंजिग केला आहे.