काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. काहीजण आपली अनेक वर्षांची कमाई, एक एक पैसा जोडून आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करतात. असंच एक प्रकरण चीनमध्ये समोर आलं आहे. इथे एक व्यक्ती एका ट्रकमध्ये ९०० किलो वजनाची चिल्लर घेऊन बीएसडब्ल्यूच्या शोरुममध्ये पोहोचला. त्याने ४८०,००० युआन म्हणजेच ५० लाख ६४ हजार रुपयांची नवीन बीएमडब्ल्यू खरेदी केली.
चीनच्या Tongren शहरात काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती पिकअप ट्रक घेऊन बीएमडब्ल्यूच्या कार शोरूममध्ये पोहोचला. शोरूमच्या कर्मचाऱ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने सांगितले की, १५०, ००० नाणी आहेत आणि यातून त्याला नवीन कार खरेदी करायची आहे. कर्मचाऱ्यांना आधी हे सगळं फारच विचित्र वाटलं, पण शोरुमच्या मॅनेजरने त्याला नंतर कारही दिली. चिल्लर मोजण्यासाठी शोरूमला बॅंकेचे कर्मचारी बोलवावे लागले होते.
असे सांगितले जाते की, कार खेरदी करणारा व्यक्ती एक बस ड्रायव्हर होता. एक लक्झरी कार खरेदी करण्याचं त्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने इतकी रक्कम जमा केली. यासाठी त्याने केवळ चिल्लर जमा केली आणि पाहता पाहता ही ५० लाखांची रक्कम झाली. मीडिया रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीला याचा अंदाजही नव्हता की, त्याच्याकडे किती पैसे जमा झाले आहेत. मग त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने चार दिवसात सगळी चिल्लर रक्कम मोजून काढली. नंतर एका पिकअप ट्रकमध्ये त्याने ही रक्कम भरुन तो शोरुममध्ये गेला.
आश्चर्याची बाब म्हणजे एकीकडे या व्यक्तीला आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला होता तर दुसरीकडे ही चिल्लर मोजण्यासाठी ११ बॅंक कर्मचारी बोलवण्यात आले होते. त्यांना ही चिल्लर मोजण्यासाठी १० तासांचा वेळ लागला. त्यानंतर शोरुममध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.