मुलींची कस्टडी मिळवण्यासाठी एका व्यक्तीने कायदेशीररित्या आपला जेंडर चेंज केला. पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर त्याला मुलींसोबत रहायचं होतं. पण त्याला याची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने सरकारी कागदपत्रांमध्ये आपला जेंडर पुरूष ऐवजी महिला केला.
ही घटना इक्वेडोरची आहे. 47 वर्षीय रामोस पत्नीपासून वेगळा झाला होता. पण त्याला त्याच्या मुलींची कस्टडी हवी होती. जी त्याला मिळत नव्हती. कारण इक्वेडोरच्या कायद्यानुसार, मुलांच्या कस्टडीसाठी आईला प्राधान्य दिलं जातं. रामोसला वाटलं की, तो पिता असल्याने त्याला कस्टडी मिळणार नाही. यामुळे तो मुलींची कस्टडी मिळवण्यासाठी कायदेशीररित्या 'आई' बनला.
Vice News नुसार, रामोसने रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या आयडीवर आपला सेक्स महिला म्हणून नोंदवला. तो म्हणाला की, आता तो सुद्धा 'आई' आहे. त्यामुळे मुलींची कस्टडी त्यालाही मिळायला हवी.
दरम्यान, रामोसने शारीरिक रूपाने आपला जेंडर बदलला नाही. ते त्याने केवळ कागदपत्रांमध्ये केलं. मुळात तो एक पुरूषच आहे. त्यामुळे तो LGBTQ कम्युनिटीच्या निशाण्यावरही आला आहे.
LGBTQ कम्युनिटीने त्यांचं मत व्यक्त केलं की, या कृत्यामुळे ते ट्रांसजेंडरना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकारांबाबत चिंतेत आहेत. भविष्यात त्यांचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.