एका व्यक्तीनं विम्याचे पैसे आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अजब षडयंत्र रचलं जे ऐकून अनेकजण हैराण झाले. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी व्यक्तीनं स्वत:च्या जीवाशी खेळ केला. हा खेळ थोडक्यात निभावला अन्यथा त्याचा जीवही गेला असता. पैशांच्या लालसेपोटी व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात घातला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
या व्यक्तीने ट्रेनच्या पटरीवर झोपून दोन्ही पाय गमावले जेणेकरुन विम्याचे पैसे मिळावे. व्यक्तीने १-२ नव्हे तर तब्बल १४ विमा पॉलिसी काढली होती. परंतु अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतरही त्याला विम्याचे २३ कोटी रुपये मिळवता आले नाहीत. यामागे काय नेमकं झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, हा प्रकार हंगरीच्या Nyircsazari येथील आहे. ज्याठिकाणी जिल्हा कोर्टाने सैंडर नावाचा हा इसम २३ कोटी ९७ लाख रुपये विम्याच्या पैशासाठी जाणूनबुजून रेल्वेच्या पटरीवर झोपलेला असं सिद्ध केले आहे. २०१४ मध्ये झालेल्या या घटनेत ५४ वर्षीय सैंडरनं त्याचे दोन्ही पाय गमावले. आता तो कृत्रिम पायांच्या सहाय्याने काम करतो. त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला आयुष्यभर व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागणार आहे. दोन्ही पाय गमावल्यानंतर सैंडरने नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांशी संपर्क साधला. परंतु त्याचे हे षडयंत्र उघड झालं.
कसा झाला खुलासा?
वास्तविक, ज्या दिवशी सैंडरने त्याचे दोन्ही पाय गमावले त्याच्या काहीच दिवस आधी त्याने १-२ नव्हे तर १४ उच्च रक्कमेच्या विमा पॉलिसी उतरवल्या होत्या. सैंडरच्या अपघाताची बातमी ऐकून विमा कंपन्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पॉलिसी रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत विलंब केला. सैंडरला या गोष्टीचा राग आला त्याने विमा कंपन्यांच्या विरोधात दाद मागण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टाच्या सुनावणीवेळी विमा कंपन्या आणि सैंडरने दोघांनी आपापलं म्हणणं कोर्टासमोर मांडले.
सैंडरनं दावा केला की, आर्थिक सल्ला घेतल्यानंतर बचत खात्याच्या तुलनेत विमा पॉलिसीवर रिटर्न चांगले मिळतात त्यासाठी त्याने पॉलिसी घेतली. सैंडरनं केलेल्या दाव्यानुसार एका काचेच्या तुकड्यावर घसरून त्याचे संतुलन बिघडले आणि तो ट्रेनच्या पटरीवर पडला. याचवेळी ट्रेन आली आणि माझे दोन्ही पाय अपघातात गेले. परंतु ७ वर्ष सुरु असलेल्या तपासात सैंडर जाणुनबुजून ट्रेनसमोर झोपल्याचं निष्पन्न झालं ज्यात त्याचे पाय तुटले असल्याचं उघड झालं. कोर्टाने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल देत सैंडरला दोषी ठरवलं.