कार आणि वेगाची आवड असणाऱ्या अनेकांसाठी लॅम्बॉर्गिनी एक स्वप्नासारखीच असते. पण या कारची किंमत इतकी आहे की, फार कमी लोकच त्यांचं स्वप्न सत्यात उतरवू शकतात. पण एका व्यक्तीने वेगळ्या स्टाईलने त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ५ कोटी रूपयांच्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये प्रवास करण्याचं स्टर्लिंग बॅकसच्या लहान मुलाचं स्वप्न होतं. आता स्टर्लिंग मुलाला इतकी महाग गाडी घेऊन देऊ शकतं नव्हता. त्यामुळे त्याने ३डी प्रिंटरच्या मदतीने एक हुबेहूब लॅम्बॉर्गिनीसारखी कार तयार केली.
स्टर्लिंग हे कोलोराडोचे केएमलॅब्समध्ये मुख्य सायन्टिफिक अधिकारी आहेत. ३डी प्रिंटरच्या मदतीने त्यांनी लॅम्बॉर्गिनी एवेंटाडोर कारसारखी हुबेहूब कार तयार केली असून त्यांचं खूप कौतुक होत आहे. खास बाब ही आहे की, ही कार केवळ शोपीस नाही. तर यात बसून तुम्ही प्रवासही करू शकता.
ऑटोब्लॉगच्या रिपोर्टनुसार, स्टर्लिंगच्या मुलाने एकदा व्हिडीओ गेम खेळताना त्यांना विचारले की, 'आपण अशी कार तयार करू शकतो का?' स्टर्लिंगने ही कार तयार करण्यासाठी आधी स्टीलचं चेसिस तयार केलं. त्यावर त्यांनी Corvette's LS1 V8 चं इंजिन बसवलं. पण बॉडीसाठी कोणतं मेटरिअल वापरलं जावं असा प्रश्न त्यांना पडला.
कसे तयार केले बॉडी पार्ट्स?
स्टर्लिंगने ३डी प्रिंटरने छोट्या छोट्या भागातच कारच्या बॉडीला प्रिंट केलं. पण प्लॅस्टिकसोबत सर्वात मोठी समस्या ही असते की, गरमीमुळे ते वितळू शकतं. त्यामुळे त्यावर त्यांनी कार्बन-फायबरचा लेप लावला आणि त्यावर पेंट केलं.
यूट्यूबवर बघून तयार केली कार
कारचे तयार झालेले छोटे छोटे पार्ट्स एकत्र जोडणं जरा कठीण काम होतं. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की, कारचा केवळ फ्रंट ब्रेकचा एक भाग तयार करण्यासाठी त्यांना ५२ तास इतका वेळ लागला. सर्वात मजेदार बाब ही आहे की, कार तयार करण्यासाठी त्यांनी यूट्यूबवरील ट्यूटोरिअल्स बघितले.
मोठ्या मेहनतीनंतर स्टर्लिंग यांनी त्यांच्या मुलासाठी लॅम्बॉर्गिनी कार तयार केली. ही कार तयार करण्यासाठी स्टर्लिंग यांना २० हजार डॉलर म्हणजे १४.२३ लाख रूपये इतका खर्च आला.