(Image Credit : Pond5) (प्रातिनिधिक फोटो)
दुसऱ्यांचं पत्र वाचायचं नसतं हे बालपणी तुम्ही मोठ्यांकडून नेहमीच ऐकलं असेल. आता तशीही पत्रे कमीच येतात. पण पूर्वी हे वाक्य नेहमीच ऐकायला मिळायचं. पण दुसऱ्याचं पत्र वाचल्याने काय होतं हे काही कुणी सांगत नव्हतं. कारण हा एक चांगुलपणाचा अलिखित असा नियम होता. पण दुसऱ्याचं पत्र वाचल्याने काय होतं याचं एक वेगळंच उदाहरण स्पेनमध्ये बघायला मिळालं. स्पेनमधील एका व्यक्तीला त्याच्या १० वर्षाच्या मुलाचं पत्र वाचणं चांगलंच महागात पडलं आहे. या व्यक्तीला मुलाचं पत्र वाचण्याच्या गुन्ह्यासाठी २.३३ लाख रूपये दंड आणि दोन वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे.
सेविले शहरात कोर्टातील एका सुनवाणीत असा आरोप करण्यात आला होता की, वडिलाने त्याच्या मुलाच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केलं आहे. त्याने मुलाच्या नावाने आलेलं पत्र उघडलं. वास्तविक पाहता त्याला ते पत्र उघडण्याचा आणि वाचण्याचा अधिकार नव्हता.
काय होतं पत्रात?
हे पत्र मुलाला त्याच्या मावशीने लिहिले होते. मुलाच्या वडिलांना हे पत्र उघडण्याचा अधिकार नव्हता. पत्रात लिहिलं होतं की, कशाप्रकारे २०१२ मध्ये वडिलांनी त्यांच्या आईला वाईट वागणूक दिली होती आणि मुलगा कशाप्रकारे वडिलांचा गुन्हा सिद्ध करू शकतो. दुसरीकडे या व्यक्तीने कोर्टात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, कशाप्रकारे मुलाची मावशी त्याच्यावर जबाब देण्यासाठी दबाव टाकत आहे.
२०१२ मध्ये मुलाच्या आईने त्याच्या वडिलाविरोधात कायदेशीर कारवाईसाठी केस केली होती. तिने पतीवर खाजगी माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप लावला होता.
पत्र वाचल्याचं समोर आल्यावर मुलाच्या मावशीने कोर्टाकडे दोन वर्षांची शिक्षा आणि २ लाख ३३ हजार रूपयांच्या दंडाची मागणी केली होती. तसेच वकिलांनी १ लाख ६८ हजार रूपयांचं अतिरिक्त दंड लावण्याचा उल्लेख केला होता. पण याचं कारण सांगितलं गेलं नाही. मुलाच्या वडिलाने स्वत:च्या बचावासाठी सांगितले होते की, ते पत्र मी चुकीने उघडलं होतं. तसेच त्यात लिहिलेल्या गोष्टी त्याने सर्वातआधी मुलाला सांगितल्या होत्या.