अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत ज्यात घरातच जुना मालक, बिल्डर किंवा इलेक्ट्रिशियननं लपवलेल्या काही चिठ्ठ्या किंवा पैसे आणि इतर वस्तू आढळल्या आहेत. मात्र फ्रांसिस चकी रेवेन नावाच्या एका टिकटॉक यूजरला (Tiktok User) आपल्या घराच्या भिंतीत (House Walls) असं काही आढळलं की ते पाहूनच त्याला धक्का बसला. त्यानं लगेचच पोलिसांना बोलवलं.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, फ्रांसिसनं टिकटॉकवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात सांगितलं आहे की त्यांना आपल्या घराच्या भिंतीमध्ये हाडे (Bones in House Wall) आढळली. या व्यक्तीनं कॅप्शन देत लिहिलं, की आता मी पोलिसांच्या येण्याची वाट पाहत आहे. मला नाही माहिती की ही कोणाची हाडे आहेत.
काहीच वेळात हा व्हिडिओ २० लाखाहून अधिकांनी पाहिला. लोकांनी लगेचच या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली. अनेक यूजर्सचं असं म्हणणं होतं, की ही हाडे माणसाची नाहीत. तर काहींनी म्हटलं की ही हाडे माणसाची असो किंवा प्राण्याची मात्र भिंतीत कशी पोहोचली.
एका यूजरनं लिहिलं, की तुमचं घर जुनं आहे आणि आधी बरेच लोक आपल्या मृत पाळीव प्राण्यांचे अवशेष भितींमध्ये ठेवत असत, जेणेकरून त्यांची आठवण कायम त्यांच्यासोबत राहील. पोलिसांनी तपास केल्यानंतर सांगितलं, की ही हाडे मेंढीची आहेत. हे समजल्यानंतर फ्रांसिसला बरं वाटलं आणि त्यांची चिंता दूर झाली. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रांसिसनं म्हटलं की या कामामुळे पोलिसांना उगीच वेळ गेला. मात्र, पोलिसांना याची माहिती देणं माझं काम होतं. मला हे समजणं गरजेचं होतं, की या भिंतीत हाडे का होती? मी त्याकडे असंच दुर्लक्ष करू शकत नव्हतो.