कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. अमेरिकेतील साऊथ कॅरोलाइनामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला 3.75 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी रुपयांहून अधिकची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वी कधीही लॉटरीचे तिकीट घेतलं नव्हतं. त्याने आयुष्यात पहिल्यांदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि तब्बल 3 कोटी रुपये जिंकले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, लॉटरी जिंकल्यानंतर व्यक्तीने सांगितले की हा एक चांगला अनुभव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लॉटरीत एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतरही तो पुन्हा कधी तिकीट खरेदी करेल की नाही हे माहीत नसल्याचं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. तो म्हणाला, "माझे सर्व लक्ष जिंकलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च करण्यावर आहे. मी पुन्हा कधी लॉटरीचं तिकीट विकत घेईन की नाही हे मला माहीत नाही."
"मी बक्षीस जिंकल्यापासून लॉटरीचं कोणतंही तिकीट घेतलेलं नाही." रिपोर्टनुसार, या व्यक्तीने 10 डॉलरचं माईटी जंबो डक्स स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केलं, ज्यावर त्याला 3.75 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. याआधी साऊथ कॅरोलाइनातील एका व्यक्तीने सुट्या पैशांनी एक तिकीट घेतलं होतं आणि 2.5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती.
व्यक्ती काही तरी वस्तू घेण्यासाठी एका दुकानात गेला, तिथे त्याला सुमारे 10 डॉलर सुटे मिळाले. या पैशातून लॉटरीचं तिकीट घ्यावं असा विचार त्याने केला. त्याने काही तिकिटे विकत घेतली आणि निकाल आल्यावर त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्याने 3 लाख डॉलरची म्हणजे सुमारे 2.5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.