सध्या फीचर फोन बाजारात कमीच दिसतात. कारण आता जमाना आहे स्मार्टफोनचा. मात्र, काही वर्षांपूर्वी एक असाही ऐतिहासिक फीचर फोन आला होता, ज्याला काही तोड नव्हती. हा फोन होता NOKIA 3310. या फोनची बॅटरी लाइफ तर दमदार होतीच सोबतच फोन आपटला तरी फुटत नव्हता. याचा फोनची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. आता म्हणाल की, इतक्या वर्षांनी या फोनची चर्चा का होतीय? तर कारणही तसंच आहे.
एका व्यक्तीला त्यांचा नोकिया ३३१० हा फोन घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेला आढळला. पण आश्चर्याची बाब म्हणजे १९ वर्षांनी जेव्हा त्यांना हा फोन आढळला तेव्हाही या फोनची बॅटरी ७० टक्के चार्ज्ड होती.
केविन मूडी असं या व्यक्तीचं नाव असून इंग्लंडच्या Ellesmere Port शहरात राहते. काही दिवसांपूर्वी केविन घरात एक चावी शोधत होते. दरम्यान त्यांना एका ड्रॉवरमध्ये नोकिया फोन मिळाला. फोन ऑन होता. केविन यांनी सांगितले की, ते हा फोन विसरले सुद्धा होते. त्यांनी सांगितले की, त्यांनी हा फोन १९ वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
त्यांनी जेव्हा फोन पाहिला तेव्हा तो केवळ ऑनच नव्हता तर त्याची बॅटरी देखील ७० टक्के चार्ज्ड होती. हे अद्भूत आहे. तसा हा फोन परफॉर्मन्ससाठी जगभरात लोकप्रिय होता. नोकिया कंपनीने हा फोन २००० सालात लॉन्च केला होता.
कंपनीने या फोनचा लोकप्रियता पाहता या फोनचं नवं व्हर्जन बाजारात आणलं. २०१७ मध्ये नोकियाने ३३१० चं नवं मॉडेल लॉन्च केलं. पण आधीच्या ३३१० ची क्रेझ स्मार्टफोनमुळे आता कमी झाल्याचे बघायला मिळते.