एखाद्या हॉटेलमध्ये ऑफर असली की तिथे खाण्याच्या शौकीनांची चांगलीच गर्दी होते. पण अनलिमिटेड ऑफर असूनही ते एका लिमिटपेक्षा जास्त काही खाऊ शकत नाहीत. पण एका व्यक्तीने एका हॉटेलमध्ये इतकं खाल्लं की, त्याला या हॉटेलने नेहमीसाठी बॅन केलंय. यारोस्लाव बोबरोवस्की असं या व्यक्तीचं नाव असून तो जर्मनीचा राहणारा आहे.
यारोस्लाव बोबरोवस्की हा ३० वर्षीय व्यक्ती काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेन्डसोबत सुशी हा स्पेशल पदार्थ मिळणार्या रेस्टॉरंट 'ऑल यू कॅन इट'मध्ये गेला होता. यावेळी त्याने एक-दोन नाही तर चक्क १०० प्लेट जेवण केलं. यारोस्लाव हा एक सॉफ्टवेअऱ इंजिनिअर असून तो आयर्नमॅन ट्रायथलॉनसाठी ट्रेनिंग करत आहे. त्यामुळे तो डाएटवर आहे. अशात तो दिवसातील २० तास काही खात नाही आणि एकदाच पोटभरून खातो. गेल्या आठवड्यात तो या हॉटेलमध्ये गेला होता.
या रेस्टॉरंटमध्ये एक ऑफर सुरु आहे. यानुसार, ग्राहकांना केवळ ११५० रुपये देऊन पोटभर जेवण करायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यारोस्लाव या हॉटेलमध्ये साधारण दीड तास थांबला आणि त्याने १०० प्लेट सुशी फस्त केले. एका वेळेनंतर वेटरने त्याला काही देणे बंद केले. तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने त्याला येऊन सांगितले की, कृपया यापुढे तुम्हा इथे येऊ नका.
आश्चर्याची बाब म्हणजे यारोस्लाव या हॉटेलचा नियमीत ग्राहक आहे. मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत सगळेच त्याला ओळखतात. पण त्या दिवशी त्याची भूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यांने स्थानिक वृत्तपत्राला माहिती दिली की, 'तो आमचा नियमीत ग्राहक आहे. आम्ही सगळे त्याला ओळखतो. पण त्या दिवशी त्याने १०० प्लेट सुशी फस्त केल्या. ही गोष्ट सामान्य नव्हती. आम्हाला ग्राहकांना परत पाठवणं चांगलं वाटत नाही. पण यावेळी असं करावं लागलं'.
यारोस्लावला हॉटेलचं हे वागणं अजिबात पसंत पडलं नाही. त्याने हॉटेलच्या रिव्ह्यू सेक्शनमध्ये याबाबत लिहिले. यावर हॉटेलच्या मालकाने स्वत: आपला मुद्दा मांडला. तो म्हणाला की, 'प्रिय यारोस्लाव, मी माफी मागतो की, आम्हाला तुला बॅन करावे लागले. पण तू नेहमीच ४ ते ५ लोकांचं जेवण एकटाच करतो'.
यावर यारोस्लाव म्हणाला की, याचं आधी मला वाईट वाटलं होतं, पण आता हसू येतं. तो म्हणाला की, 'इथे आणखी एक सुशी रेस्टॉरंट आहे. आता मी तिथे जात असतो. त्यांना माझ्या भूकेबाबत माहीत आहे. पण त्यांनी मला बॅन नाही केलं'.