जगभरातील जास्तीत जास्त लोक कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत. लोक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत आहेत. पण काही लोक असेही आहेत जे ज्यांना घरात राहवत नाहीये. आता हीच घटना बघा ना..फ्रान्समधील एक व्यक्ती स्वस्त सिगारेट घेण्यासाठी चक्क एका देशातून दुसऱ्या देशात चालत जात होता. पण त्याच्यासोबत असं काही झालं की, त्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. स्थानिक माउंटेन रेक्स्क्यू सर्व्हिसकडून सांगण्यात आले की, जेव्हा तो आम्हाला भेटला तेव्हा तो थकलेला होता आणि थंडीने थरथरत होता.
फेसबुक पोस्टनुसार, 'ही व्यक्ती शनिवारी दक्षिण फ्रान्सच्या पेर्पिग्नन शहरातून स्पेनच्या ला जोन्केरा शहरात स्वस्त सिगारेट खरेदी करण्यासाठी जात होती. आधी त्याने कारने जाण्याचा विचार केला, पण त्याला चेकपाइंटवर रोखण्यात आलं. त्यानंतर त्याने दोन्ही देशांच्या मधील डोंगराहून जाण्याचा प्लॅन केला.
घनदाट झाडांमधून जात असताना तो एका तलावात जाऊन पडला. त्यानंतर पोलिसांना तो पायरेनीज परिसरात सापडला. तो थंडीने थरथरत होता. त्यामुळे तो पूर्णपणे शुद्धीवर नव्हता. म्हणून तो कुणाशी संपर्क करू शकला नाही.
या व्यक्तीवर आता कोरोना व्हायरस लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून दंड लावण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केला नाही. या व्यक्तीला 135 यूरो म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 11 हजार 125 रूपये दंड ठोठावण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, 'तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की, आपल्या घरांमधेच रहा'.