दातांची समस्या जाणवत असेल तर आपण हमखास डेंटिस्टकडे जातो. तो गरजेनुसार विविध उपचार करतो. पण अनेकदा उपचार केल्यावर काही विचित्रच परिणाम दिसतात किंवा घटना घडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीच्या दातांमध्ये त्रास जाणवत असल्याने त्याने डेंटिस्टकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यासोबत पुढे जे काही घडलं ते पाहून तो हादरला. कोणी कल्पना देखील करू शकत नाही अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अमेरिकेच्या इलिनॉयस स्टेटमधील 60 वर्षांचे टॉम जोज्सी (Tom Jozsi) यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.
दातांवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडे गेले. तिथं त्यांनी आपल्या दातात फिलिंग करून घेतलं. दातांवर ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर टॉम यांच्यासोबत जे घडलं ते हैराण करणारं होतं. टॉम यांनी सांगितलं की, दातांचं फिलिंग करताना त्यासाठी डॉक्टर वापरत असलेल्या एका ड्रिलचा तुकडा त्यांच्या घशातून खाली गेला याची त्यांना कल्पनाच नव्हती. जेव्हा टॉम यांनी सीटी स्कॅन केलं तेव्हा हा ड्रिलचा तुकडा फक्त घशात नाही तर त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं.
एक इंच लांबीचा हा तुकडा होता. जेव्हा तो घशातून आत गेला तेव्हा त्यांना काहीच जाणवलं नाही. थोडा खोकला आला. डॉक्टरांच्या मते, टॉम यांनी हा तुकडा गिळला नव्हता तर तो इनहेल केला होता. म्हणजे जेव्हा त्यांना खोकला आला तेव्हा कदाचित हा तुकडा श्वासनलिकेतून आत गेला असावा. सामान्य स्कॅनरमध्ये हे दिसलं नव्हतं. डॉक्टरांनी टॉम यांच्या फुफ्फुसात अडकलेला हा तुकडा बाहेर काढण्यासाठी कॅन्सर डिटेक्ट करणाऱ्या एका डिव्हाइसची मदत घेतली आणि तो बाहेर काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.