यशस्वी व्हायचं असेल तर खूप कष्ट करावे लागतात. पण काही जण शॉर्टकट मारायला जातात आणि योग्य वेळी त्यांना याचा फटकाही बसतो. मात्र काही जण शॉर्टकट मारताना डोकं वापरतात. हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करतात आणि यशस्वी होतात. अशाच प्रकारे यशस्वी झालेल्या एका व्यक्तीनं त्याचा अनुभव रेडइटवर शेअर केला आहे.
जवळपास काहीच न करता एका आपण एका कंपनीत ५ वर्षे होतो. या कालावधीत अनेकदा आपल्या कामाचं कौतुक झालं. प्रमोशन्स मिळाली. पगारवाढ झाल्याचं त्यानं सांगितलं. २०१५ मध्ये संबंधित व्यक्तीनं काम सुरू केलं. तो रात्रपाळीत काम करायचा. ऑर्डरचा तपशील भरायचा आणि तो कंपनीच्या सिस्टिममध्ये लोड करायचा असं त्याच्या कामाचं स्वरुप होतं. त्यासाठीचं प्रशिक्षण त्याला देण्यात आलं. आपल्याला देण्यात आलेलं काम ऑटोहॉटकीच्या माध्यमातून अगदी सहज होऊ शकतो हे सुरुवातीलाच त्याच्या लक्षात आलं.
सॉफ्टवेअर ऑटोमेशनचा वापर केल्यास आपल्याला फारसं काहीच करावं लागणार नाही याची खात्री पटल्यावर तो एका फ्रीलान्स कोडरकडे गेला. त्याच्याकडून सॉफ्टवेअर डिझाईन करून घेतलं. यासाठी त्याला आलेला खर्च त्याच्या दोन महिन्यांच्या पगाराइतका होता. त्यानंतर कर्मचाऱ्याचं काम सोपं होऊन गेलं. दर तासाला किती ऑर्डर प्रोसेस करायच्या आहेत इतकंच काम कर्मचारी करायचा. वर्क फ्रॉम होम असल्यानं कर्मचारी किती वेळ काम करतोय याची कंपनीला कल्पना नव्हती. वेळेत काम होतंय आणि त्यात कोणताही दोष नाही, इतकंच कंपनीला माहीत होतं.
पहिल्या दोन वर्षात कर्मचाऱ्यानं जेमतेम ५ मिनिटांपेक्षा थोडा अधिक वेळ कामासाठी दिला. बाकीच्या वेळेत तो चित्रपट पाहायचा, झोपायचा, भटकायचा. काम उत्तम सुरू असल्यानं त्याला कंपनीनं प्रमोशन दिलं. पगारवाढ दिली. फार कोणाशी बोलायची सवय नसल्यानं त्यानं त्याची सीक्रेट कोणालाच सांगितलं नाही.
प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. त्याप्रमाणे या गोष्टीचाही शेवट झाला. कंपनीनं मानवी हस्तक्षेपाशिवाय डेटा एंट्री करणारं सॉफ्टवेअर तयार केलं. त्यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्याला नारळ दिला. विशेष म्हणजे पाच वर्षांत कर्मचाऱ्यानं त्याचं गुपित कोणालाच सांगितलं नव्हतं. त्याच्या पत्नीलादेखील याची कल्पना नव्हती.