आपण रोजच्या जीवनात विविध गोष्टींसाठी खर्च करत असतो. पण अनेकदा आजारी पडल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. अशावेळी उपचारासाठी येणारा खर्च देखील खूप असतो. काही ठिकाणी रुग्णांची अक्षरश: लूट केली जाते. औषधोपचाराच्या नावाने भलं मोठं बिल दिलं जातं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीला फक्त 2 दिवस रुग्णालयामध्ये राहिल्यानंतर तब्बल 52 लाखांचं बिल देण्यात आलं आहे. संतापलेल्या रुग्णाने रुग्णालयातून घरी येताच स्वतःच एक्स-रे मशीन तयार केलं आहे.
यूट्यूबवर व्हिडीओ बनवणारा विल ओस्मान हा इंजिनिअर आहे. आजारी पडल्यावर त्याने दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. ओस्मानला तिथे 2 दिवस दाखल करावं लागलं आणि यावेळी त्याला मिळालेले उपचार अगदी प्राथमिक होते. जेव्हा त्याला या प्राथमिक उपचाराचा खर्च $69,000 म्हणजेच 52 लाख रुपये आला तेव्हा ओस्मानचं इंजिनीअर डोकं मेडिकलकडच्या दिशेने धावू लागलं.
सुदैवाने, विल ओस्मानने वैद्यकीय विमा घेतला होता आणि या बिलासाठी त्याला त्याच्या खिशातून फक्त $2,000 म्हणजेच 1.5 लाख रुपये द्यावे लागले. बाहेर येताच 52 लाखांचं बिल चुकीचं सिद्ध करूनच दाखवायचं, असा विचार ओस्मानने केला. फक्त काही अँटीबायोटिक्स आणि एक्स-रेसाठी त्याला एवढं बिल भरावे लागलं. अशा परिस्थितीत कंटेंट क्रिएटर ओस्मान याने स्वतःच एक्स-रे मशीन बनवण्यास सुरुवात केली. त्याने या मशीनची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा कमी ठेवली.
विल ओस्मानने तयार केलेल्या मशीनसाठी $400 चा वीज पुरवठा आणि $155 एक्स-रे व्हॅक्यूम ट्यूबची गरज होती. याशिवाय त्याने काही गीजर काउंटर आणि शीट मेटल रोलसह हा प्रयोग सुरू केला. Unilad सोबत बोलताना त्याने सांगितलं की एक्स-रे पाहण्यासाठी विशेष मटेरियल शीट आणि इंटेन्सिव्ह स्क्रीनची गरज आहे. त्याने DSLR कॅमेऱ्याने फोटॉन्स कॅप्चर केले आणि 40 किलोवॅट सिलिकॉन इन्सुलेटेड वायर आणि ट्यूब वापरून हे साध्य केलं. डेमोनंतर ओस्मानने हे मशीन डिसमेंटल केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.