वाढतं वय ही जगापासून लपून राहावी अशी गोष्ट नाही, परंतु अनेकांना नेहमीच तरुण दिसावं असं वाटतं आणि त्यासाठी ते छोटे-मोठे प्रयत्नही करतात, परंतु काही लोकांमध्ये ही इच्छा प्रचंड असते. अशीच एक घटना अमेरिकेत समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिकाला तरुण दिसण्याचं इतकं वेड आहे की तो दिवसाला 111 गोळ्या खातो.
ब्रायन जॉन्सन असं या व्यक्तीचं नाव आहे. स्वत:ला म्हातारं होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी आपली कंपनी 80 कोटी डॉलरला विकली आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. जॉन्सन म्हणतात की, ते विविध आरोग्य देखरेख उपकरणं वापरून शेकडो गोळ्या खात आहे.
18 वर्षांच्या तरुणाप्रमाणे त्यांच्या शरीरातील सर्व अवयवांनी काम करावेत हेच त्यांचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी ते काहीही करू शकतात. जॉन्सन यांनी आपल्या मुलाचं रक्त आपल्या शरीरात चढवलं. डॉक्टरांच्या मते, असं केल्याने त्याचं ब्लड सर्कुलेशन सुरू होईल. तरुण राहण्याची ही इच्छा चांगलीच महागात पडली आहे.
जॉन्सन यांनी या संपूर्ण प्रयत्नाला ब्लू प्रिंट असं नाव दिलं आहे. या प्रोजेक्टसाठी 40 लाख डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केल्याचा त्यांचा दावा आहे. ब्लूप्रिंट नावाच्या या प्रोजेक्टबाबतचे सर्व निर्णय जॉन्सनचे डॉक्टर घेतात, असं सांगितलं जातं. त्यासाठी ते अत्यंत कठोर नियम पाळतात. त्यांच्यासाठी आरोग्यदायी आहार तयार करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.