(प्रातिनिधीक फोटो - Image Credit : EYDT)
अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, हिरोईनने जर लग्नाला नकार दिला तर व्हिलन तिच्या वडिलांना किडनॅप करून घेऊन जातो. अशी काहीशी फिल्मी घटना प्रत्यक्षातही घडली आहे. एकतरफी प्रेमात व्यक्ती सगळंकाही स्वत:च विचार करत असतो. एका तरूणाचं एका तरूणीवर प्रेम होतं. त्याने तिला सांगितलं सुद्धा. तो लग्नासाठी तिच्या मागे लागला. तिने त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष दिलं नाही. घरच्यांचाही या लग्नाला विरोध होता. सगळंकाही करून झाल्यावर तरूणाने थेट मुलीच्या वडिलांचं अपहरण केलं. जेणेकरून लग्नाची बोलणी करता यावी.
ही घटना घडली दिल्लीच्या द्वारकामध्ये. मुलीचे वडील एका दुकानात काम करत होते. पण ते कामावर गेलेच नाहीत. त्यामुळे दुकान मालकाने दुसऱ्या व्यक्तीला विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, काही लोक त्याला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. दुकान मालकाने लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
अपहरण केल्यावर काही वेळाने मुलीच्या फोनवर त्या तरूणाने फोन केला. मुलीने फोन उचलला, तिकडून वडिलांनी सांगितले की, 'मी सोनीपतमध्ये आहे आणि सुरक्षित आहे. संजू चांगला मुलगा आहे आणि तू त्याच्याशी लग्न कर'.
जेव्हा वडिलांनी संजूचं नाव घेतलं तेव्हा मुलीला शंका आली की, संजूने त्यांचं अपहरण केलंय. आधी तो लग्नासाठी दबाव टाकत होता. याच कारणाने मुलीने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केलं होतं. नंतर मुलीनेही याबाबत पोलिसांना माहिती दिली.
संजू आणि ही मुलगी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून भेटले होते. दोघांनी एक वर्ष एकमेकांना डेटही केलं. नंतर मुलीला कळालं की, संजूचं आणखी एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे. तिने त्याच्यापासून दूर राहणे सुरू केले. पण संजू लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.
पोलिसांनी संजू मोबाइल नंबर सर्व्हिलांसवर लावला. तपास सुरू झाला. पोलिसांना कळालं की, नंबर मथुरेच्या आजूबाजूला आहे. पोलिसांना सापळा रचून संजूला मथुरेतून अटक केली. मुलगी आणि मुलीच्या घरचे लग्नासाठी नकार देत होते म्हणून त्याने मुलीच्या वडिलांचं अपहरण केलं होतं.