ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 67 वर्षीय व्यक्तीने 91 वर्षीय महिलेसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांनी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिची कोट्यवधींची संपत्ती आता 67 वर्षीय व्यक्तीच्या नावे झाली आहे. मात्र यावर महिलेचं कुटुंबीय खूश नाही. त्यांनी या व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. महिला Dementia या आजाराने ग्रस्त असताना व्यक्तीने महिलेसोबत लग्न केल्याचा त्यांनी दावा केला आहे. या आजारात महिलेने आपली विचार करण्याची क्षमता गमावली होती.
द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, 91 वर्षीय जोआन ब्लास यांचा मार्च 2016 मध्ये मृत्यू झाला. मृत्यूआधी त्यांनी 67 वर्षीय कोलमॅन फोलानसोबत लग्न केलं होतं. जोआनच्या मृत्यूनंतर आता तिची दोन कोटींहून अधिक किंमत असलेली संपत्ती कोलमॅनच्या नावे झाली आहे. पण आपल्या आईच्या मृत्यूनंतर संपत्तीत हिस्सा न मिळाल्याने मुलांनी आता याविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. महिलेचा मुलगा मायकल आणि मुलगी फ्रँक्सने आपल्या आईच्या लग्नाबाबत काहीच माहीत नसल्याचा दावा केला आहे.
कोलमॅनने अत्यंत गुप्त पद्धतीने आई जोआनसोबत लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेलं घर हे कोलमॅनच्या नावावर आहे. तसेच महिलेचे तब्बल 35 लाखांचे सेविंग देखील त्याचेच आहे. जोआनच्या मुलाने आणि मुलीने याविरोधात आता कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी कोलमॅनने आपल्या आईची फसवणूक करून लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.