एका तरूणाने त्याच्या वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीसोबत लग्न केलं. त्याच्या विधवा आईनेही मुलाला तिच्या पतीचा खून करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीसोबत लग्न करण्यापासून रोखलं नाही. ही घटना पूर्व आफ्रिकेतील देश रवांडामधील (Ravanda) आहे. १९९४ मध्ये रवांडामध्ये नरसंहार झाला होता. १०० दिवसात साधारण ८ लाख लोकांची हत्या करण्यात आली होती. यावेळी बर्नाडेट मुकाकबेराच्या पतीचीही हत्या करण्यात आली होती. एका मुलाखतीत बर्नाडेटने बीबीसीला सांगितलं की, तेव्हा जे झालं त्याच्याशी आमच्या मुलांचा काही संबंध नाही. हे दोघे प्रेमात पडले आणि एकमेकांवर प्रेम करण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही.
नरसंहाराची सुरूवात ६ एप्रिल १९९४ मध्ये रंवाडाच्या राष्ट्रपतींच्या हत्येनंतर झाली होती. ते हुतू समुदायातील होते. घटनेच्या काही तासांनंतरच याचा राग तुत्सी समुदायातील लोकांमध्ये पसरला. हूतू समुदायातील लोक आपल्या आजूबाजूच्या तुत्सी समुदायातील लोकांची हत्या करू लागले.
बर्नाडेट आणि तिचा पती कबेरा वेदास्ती तुत्सी समुदायाचे होते. तेच त्यांचे शेजारी ग्रेटियन न्यामिनानी हूतू समुदायाचे होते. हे दोघेही शेतकरी होते. नरसंहार संपला तेव्हा तुत्सी समुदायाचे लोक सत्तेत आले. ज्यानंतर हत्येत सहभागी लाखों लोकांना पकडण्यात आलं. ग्रेटियनलाही पकडण्यात आलं.
२००२ साली कोर्टात ग्रेटियनने बर्नाडेटसमोर तिच्या पतीची हत्या केल्याचं मान्य केलं. यासाठी त्याने बर्नाडेटची माफीही मागितली. त्यावेळी बर्नाडेटने त्याला माफही केलं. त्यामुळे ग्रेटियनची १९ वर्षांची शिक्षा टळली. त्याला दोन वर्षांची कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा मिळाली. नंतर सोडून दिलं.
मात्र, सुनावणी दरम्यान ग्रेटियन १० वर्ष डिटेंशनमध्ये होता. यादरम्यान दोन्ही परिवारातील जवळीक वाढली होती. ग्रेटियनची मुलगी यांकुरिजे डोनाटा बर्नाडेटच्या घरी येऊन तिची मदत करत होती. नरसंहारा दरम्यान ती ९ वर्षांची होती. तेच बर्नाडेटचा मुलगा अफ्रेड तेव्हा १४ वर्षांचा होता.
यांकुरिजे डोनाटा म्हणाली की, मी अफ्रेडच्या आईची मदत करत होते. मला वाटतं याच कारणाने तो माझ्या प्रेमात पडला. तेच बर्नाडेट म्हणाली की, यांकुरिजेला माहीत होतं की, तिच्या वडिलांनी माझ्या पतीची हत्या केली. तरी सुद्धा ती माझ्या मदतीसाठी येत होती. मला तिचं साफ मन आणि चांगलं वागणं आवडलं. त्यामुळे मी तिला माझी सून होऊ दिलं. नंतर २००८ मध्ये कपलने लग्न केलं.