(Image Credit : wikipedia.org)(प्रातिनिधिक छायाचित्र)
टेक्नॉलॉजीमुळे लोकांचं जीवन सोपं झालंय, कामं सोपी झालीत हे खरंय. मात्र याचे अनेक फायदे असले तरी नुकसानही भरपूर आहेत. अनेकदा टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी विचित्रही घडतं. आता हेच बघा ना...इंडोनेशियातील (Indonesia) एका नवरदेवासोबत असाच एक विचित्र किस्सा घडला. 'जाना था जपान पोहोच गये चीन' असं काहीसं या घटनेला म्हणता येईल. झालं असं की, नवदेवाला ज्या लग्न घरी जायचं होतं तो तिथे न जाता दुसऱ्याच नवरीच्या लग्न मंडपात शिरला. आणि हा सगळा गोंधळ झाला तो गुगल मॅपमुळे (Google Map).
आश्चर्याची बाब म्हणजे या नवरदेवाची वरात चुकीच्या लग्न मंडपात शिरली. पण समोरच्या लोकांनी सुद्धा या पाहुण्यांचं चांगलं स्वागत केलं आणि फ्रेश होण्याची व्यवस्थाही केली. अशात दोन्ही परिवारातील लोक संवाद साधत असताना नशीबाने वेळेवर हा खुलासा झाला की, नवरदेव चुकीच्या लग्न घरी आला आहे. काही वेळातच चूक सर्वांच्या लक्षात आली आणि एकच हशा पिकला.
Tribun न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एकाच गावात दोन कार्यक्रम होते. एक लग्न सोहळा होता आणि एक साखरपुडा होता. बरं ह्या सर्व गोंधळाबाबत नवरीला काहीच कल्पना नव्हती. कारण ती आनंदी होती आणि मेकअप करण्यात बिझी होती. चुकीच्या लग्न मंडपात चुकीचा नवरदेव आल्याच्या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात आलेली वरात परत जाताना दिसत आहे. तर काही महिला हसतानाही दिसत आहेत.
Kompas ने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाकडील लोक लग्न मंडपाचा शोध घेण्यासाठी गुगल मॅपच्या भरोशावर राहिले. त्यांना सेंट्रल जावाच्या लोसारी हॅमलेट गावात जायचं होतं. अशात लोसारी हॅमलेटऐवजी नवरदेवाची वरात जेंगकोल हॅमलेट गावात पोहोचले. दोन्ही गावे आजूबाजूला आहेत. ज्या लग्नात नवरदेव पोहोचला त्या नवरीचं नाव मारिया उल्फा असं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उल्फाने सांगितले की, तिचा होणार पती आणि त्याच्या परीवारातील लोकांना येण्यास उशीर झाला. ते रस्त्यात टॉयलेटचा शोध घेत होते. यादरम्यानच दुसरा नवरदेव आणि त्याची वरात तिथे पोहोचली. ती म्हणाली की, 'मला ओळखत नसलेल्या माणसांचा ग्रुप पाहून मला धक्काच बसला. अशात तिच्या एका काकाच्या हा गोंधळ लक्षात आला आणि वेळीच मोठा अनर्थ टळला.
रिपोर्टनुसार, नवरदेव आणि त्याच्या परीवाराने नवरीकडील म्हणजे उल्फाकडील लोकांनी माफी मागितली. त्यांच्या मदतीनेच त्यांनी मूळ लग्न घर शोधलं. नंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोक तर असंही म्हणाले की, हे नवरदेवाच्याही लक्षात कसं आलं नाही की, तो चुकीच्या ठिकाणी पोहोचलाय.