आइस्क्रीम चाहत्यांनी हे चांगलंच अनुभवलं असेल की, आइस्क्रीम चाटून-पुसून खाल्ली की वेगळीच मजा येते. अनेकजण आइस्क्रीम निवांत चाटून खात बसतात. पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की, आइस्क्रीम चाटून खाणं गुन्हा आहे तर तुम्ही समोरच्याला वेड्यात काढाल. हे जरा विचित्र वाटेल पण असं झालंय. अमेरिकेतील एका व्यक्तीला आइस्क्रीम चाटल्यावर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता आइस्क्रीम चाटली म्हणून या व्यक्तीला ३० दिवस तुरूंगात रहावं लागणार आहे. इतकेच नाही तर आइस्क्रीम कंपनीला भरपाई सुद्धा द्यावी लागेल.
अमेरिकेतील एका व्यक्तीने एका दुकानात लोकप्रिय ब्लू बेल आइस्क्रीमचा एक मोठा बॉक्स घेतला. हा बॉक्स उघडून त्यातील आइस्क्रीम त्याने चाटली आणि बॉक्स पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवला. आइस्क्रीम चाटण्याचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता या व्यक्तीला ३० दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि त्याला २ हजार डॉलरचा दंडही ठोठावला आहे.
अमेरिकेच्या टेक्सास शहरातील पोर्ट ऑर्थरमधील ही घटना आहे. इथे राहणारा डी आड्रिन एक्विन एंडरसनने हाफ गॅलनचा व्हॅनिला ब्लू बेल आइस्क्रीमचा बॉक्स खरेदी केला होता. आइस्क्रीम खरेदी करण्याआधी त्याने एका व्हिडीओ काढला होता. यात तो आइस्क्रीमचा बॉक्स उघडून आइस्क्रीम चाटताना दिसत आहे. नंतर बॉक्स पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवतानाही दिसतो आहे. ही घटना ऑगस्ट २०१९ मधील आहे. पण त्याला शिक्षा आता झाली आहे. व्हिडीओही आता व्हायरल झालाय.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, एंडरसन म्हणाली की, त्याने केवळ व्हायरल करण्यासाठी व्हिडीओ काढला होता. पण २४ वर्षीय एंडरसनचा हा कारनामा गुन्हा ठरला. कोर्टाने एंडरसनचा हा कारनामा एका स्टंटपेक्षा जास्त मानला. कोर्ट म्हणाले की, ही बाब लोक कॉपी करू शकतात. अशाप्रकारच्या गोष्टी व्हायरल करणं योग्य नाही.
एंडरसनने कोर्टात सांगितले की, त्याने आइस्क्रीमचा बॉक्स फ्रीजरमध्ये ठेवला होता. आणि त्यानंतर आइस्क्रीम बॉक्स खरेदीही केला होता. पण कोर्टाने सांगितले की, त्याच्या अशा वागण्याने कंपनीला नुकसान झालं. यामुळे कंपनीला त्यांची आइस्क्रीम मार्केटमधून काढावी लागली होती. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, फूड टेम्परिंक काही गंमत नाहीय.