ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 27 - रिक्षा चालकांसोबत होणारे वाद मुंबईकरांसाठी नवे नाहीत. जवळचं भाडं नाकारण्यावरुन मुजोर रिक्षाचालकांसोबत प्रवाशांचे रोज वाद होत असतात. मात्र 2 रुपये सुट्टे नसल्याने रिक्षाचालकासोबत झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला असल्याची धक्कादायक घटना विक्रोळीमध्ये घडली आहे. फक्त 2 रुपयांसाठी झालेल्या वादानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या रिक्षाचालकाला पकडताना रिक्षा अंगावर पडल्याने चेतन आचिर्णेकरचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसादला अटक केली आहे.
विक्रोळीतील गोदरेज कॉलनीमध्ये राहणारा चेतन आचिर्णेकर शुक्रवारी गोव्याहून घऱी परतत होता. विमानतळावरुन त्याने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली होती. चेतन घरी पोहोचला तेव्हा रिक्षाचं भाडं 172 रुपये झालं होतं. चेतनकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने घरी जाऊन 200 रुपये आणि रिक्षाचालकाला दिले. मात्र 2 रुपये सुट्टे नसल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाला.
चेतनच्या वडिलांनी मध्यस्थी करत चेतनला वरचे 8 रुपये सोडून दे सांगत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. वडिलांचं ऐकून चेतन घरी जात असताना रिक्षाचालकाने चेतनला शिवीगाळ केली. त्यानंतर रागावलेल्या चेतनने रिक्षाचालकाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत रिक्षाचालकाने रिक्षा सुरु केली होती, आणि तेथून पळ काढत होता. चेतनने रिक्षाचा पाठलाग करत रिक्षाचा दांडा पकडला. पण दुर्देवाने रिक्षाचा तोल गेला आणि चेतनच्या अंगावर पडली.
रिक्षा अंगावर पडल्यामुळे चेतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. चेतनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. बीबीएतील ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नुकतीच चेतनला अकाऊण्टन्सी फर्ममध्ये नोकरी लागली होती. चेतनच्या मृत्यूने त्याच्या घरच्यांना जबर धक्का बसला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसाद याला अटक केली असून न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे.