(Main Image Credit : independent.co.uk) (सांकेतिक फोटो)
सध्या देशभरात ट्रॅफिकच्या नव्या नियमांमुळे लोकांना नियम तोडणं चांगलंच महागात पडत आहे.लोकांना भराव्या लागलेल्या अव्वाच्या-सव्वा दंडावरूनही चर्चा सुरू आहे. अशातच ब्रिटनमधील एक घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणारे ७१ वर्षीय रिचर्ड कीडवेल यांना वेगाने गाडी चालवल्याने दंड पडला होता. त्यांना १०० पाउंड म्हणजेच साधारण ८८०० रूपये दंड लावला. मात्र, हा दंड न भरता या विरोधात ते कोर्टात गेले. कोर्टात केस चालवण्यासाठी त्यांना तब्बल ३० हजार पाउंड म्हणजेच २६.६ लाख रूपये खर्च आला. पण इतका खर्च करूनही ते केस हरले.
नोव्हेंबर २०१६ ची घटना आहे. रिचर्ड एका रोड ट्रिपवर वॉर्सेस्टरला जात होते. पोलिसांनी स्पीड कॅमेरातून त्यांच्.या गाडीचा वेग मोजला. गाडीचा वेग ३५एमपीएच होता. पण त्या रस्त्यावर जास्तीत जास्त ३०एमपीएचचा स्पीडचा नियम आहे. त्या दिवसाला आठवत रिचर्ड यांनी सांगितले की, 'माझा संपूर्ण दिवस खराब गेला होता. मला एके दिवशी नोटीस मिळाली. पण मी चांगल्याप्रकारे सांगू शकतो की, माझी गाडी फार वेगात नव्हती. त्यामुळेच मी चालानाविरोधात लढाई केली'.
रिचर्ड यांनी त्यानंतर एक व्हिडीओ आणि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपर्ट कामावर ठेवला. कारण त्यांना हे सिद्ध करायचं होतं की, पोलिसांच्या कॅमेरात काहीतरी गडबड होती. पण त्यांना याचा जराही अंदाज नव्हता की, त्यांची ही लढाई तीन वर्ष चालेल आणि इतकी महागात पडेल.गेल्या तीन वर्षात १०० पाउंडच्या दंडाविरोधात कायदेशीर लढाईत रिचर्ड यांनी ३० हजार पाउंड खर्च केले. यातील २१ हजार पाउंड तर केवळ वकिलांची फी होती. तर ७ हजार पाउंड कोर्ट आणि त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च होता. रिचर्ड सांगतात की, त्यांना अजिबात अंदाज नव्हता की, कोर्टाच्या कारवाईला इतका वेळ लागेल.
रिचर्ड सांगतात की, 'जे पैसे खर्च झालेत त्याचा मला पश्चाताप आहे. मला फक्त न्याय हवा होता. मी या केसवर जे काही पैसे खर्च केलेत, त्यातील जास्तीत जास्त पैसे मी मुलांसाठी ठेवणार होतो'. दरम्यान, आता हे स्पष्ट नाही की, कोर्टाच्या निर्णयाला रिचर्ड वरच्या कोर्टात आव्हान देतील की नाही. ते म्हणतात की, 'मी या सिस्टीमसमोर थकलो आहे'.